इस्लामाबादमधील मशिदीवर भीषण आत्मघाती हल्ल्यात 30 हून अधिक पाकिस्तानी नागरिकांचा बळी गेला. एवढचं नव्हे तर अमेरिकन युद्धांच्या नादात पाकिस्तानचे तब्बल 75,000 नागरिक मृत्यूमुखी पडले. तर पाकिस्तानला 123 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले. त्याबदल्यात अमेरिकेने पाकिस्तानला केवळ 20 अब्ज डॉलर्सची तुटपुंजी मदत दिली. याचपार्श्वभूमिवर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी नॅशनल असेंब्लीमध्ये तालिबानचा उल्लेख करत अमेरिकेवर थेट निशाणा साधला आहे. अमेरिकेने आपला 'टॉयलेट पेपर'सारखा वापर केला आणि नंतर फेकून दिले असं म्हणत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अत्यंत अपमानजनक वक्तव्य करत भर सभेत अमेरिकेवर निशाणा साधला आहे.
यावेळी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, "पाकिस्तानने इस्लामचे रक्षण करण्यासाठी अफगाणिस्तानच्या भूमीवर झालेल्या दोन्ही युद्धांमध्ये भाग घेतला नाही. जिहादच्या नावाखाली अफगाणिस्तानविरुद्धच्या युद्धात त्यांचे लोक मारले गेले. अमेरिकेने पाकिस्तानचा वापर एखाद्या 'टॉयलेट पेपर'सारखा केला आणि नंतर फेकून दिले. 1980 च्या दशकात अफगाणिस्तानमध्ये रशियाविरुद्ध जे बंड झाले, ते अमेरिकेच्या सांगण्यावरून करण्यात आले होते. 1999 नंतर, पाकिस्तान पुन्हा अमेरिकेचा पाठिंबा मिळविण्यासाठी युद्धात सहभागी झाला. त्याला जिहाद नाव दिले गेले, पण तो जिहाद नव्हताच. ज्यासाठी आम्हाला मोठी किंमत मोजावी लागली आहे. पाकिस्तान इतरांच्या युद्धात एक प्यादे म्हणून उभा राहिला", त्यांनी या निर्णयांसाठी माजी लष्करप्रमुख जनरल झिया-उल-हक व जनरल परवेझ मुशर्रफ यांना जबाबदार ठरवले. दरम्यान पाकिस्तानी संसदेतील या विधानामुळे आता जागतिक स्तरावर, अमेरिका आणि पाकिस्तानच्या संबंधांमध्ये नवा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.