Oil-Gas Discovery: इंधनाच्या संकटात भारताच्या शेजारील देशाला लागला जॅकपॉट; सापडला तेल आणि वायूचा अथांग साठा

ओजीडीसीएलने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, या विहिरीच्या 'लोअर गोरू फॉर्मेशन' (Lower Goru Formation) या भूगर्भीय स्तरातून दररोज तब्बल 2,000 बॅरल कच्चे तेल काढले जाऊ शकते.

Oil-Gas Discovery: इंधनाच्या संकटात भारताच्या शेजारील देशाला लागला जॅकपॉट; सापडला तेल आणि वायूचा अथांग साठा

Oil- Gas Discovery:  सध्या जागतिक पातळीवर इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या वादामुळे 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' (Strait of Hormuz) हा सागरी व्यापारी मार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या असून भारतासह जगातील अनेक देशांना इंधन तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. अशा भीषण ऊर्जा संकटाच्या काळात भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानच्या हाती मात्र एक मोठा खजिना लागला आहे, ज्यामुळे त्यांच्या देशांतर्गत इंधनाची चिंता काही प्रमाणात मिटण्याची शक्यता आहे.

सिंध प्रांतात शोधला हायड्रोकार्बनचा खजिना
पाकिस्तानच्या सरकारी मालकीच्या 'ऑइल अँड गॅस डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड'ने (OGDCL) ही मोठी गूड न्यूज दिली आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील संगर (Sanghar) जिल्ह्यात बऱ्याच काळापासून बंद अवस्थेत असलेल्या 'बोबी डीप-1' (Bobi Deep-1) नावाच्या विहिरीचे पुनरुज्जीवन करताना तेथे तेल आणि नैसर्गिक वायूचे प्रचंड साठे शोधण्यात कंपनीला यश आले आहे. या भागातील भूगर्भात हायड्रोकार्बनचे मोठे साठे सक्रिय असल्याची अधिकृत पुष्टी आता शास्त्रज्ञांनी केली आहे.

दररोज होणार हजारो बॅरल तेल आणि वायूचे उत्पादन
ओजीडीसीएलने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, या विहिरीच्या 'लोअर गोरू फॉर्मेशन' (Lower Goru Formation) या भूगर्भीय स्तरातून दररोज तब्बल 2,000 बॅरल कच्चे तेल काढले जाऊ शकते. याशिवाय, याच विहिरीतून रोज 1.1 दशलक्ष स्टँडर्ड क्युबिक फूट नैसर्गिक वायूचे उत्पादन घेण्याची क्षमता उपलब्ध झाली आहे. 'बोबी' आणि 'धमराकी' खाण लीज क्षेत्राच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि पहिलाच क्रांतिकारी शोध मानला जात आहे.

तांत्रिक आव्हानांवर मात करत विद्यापीठाच्या मदतीने यश
हा प्रकल्प पूर्ण करणे पाकिस्तानसाठी अजिबात सोपे नव्हते. सुरुवातीला ड्रिलिंग (खोदकाम) करताना अनेक कठीण तांत्रिक अडचणी आणि भौगोलिक आव्हाने समोर आल्यामुळे कंपनीला हे काम अर्धवट सोडून द्यावे लागले होते. मात्र, खचून न जाता ओजीडीसीएलच्या अभियंत्यांनी आणि भूगर्भशास्त्रज्ञांनी जामशोरो येथील सिंध विद्यापीठाच्या 'सेंटर फॉर प्युअर अँड अप्लाइड जिओलॉजी'च्या तज्ज्ञांशी हातमिळवणी केली. आधुनिक सर्वेक्षण आणि नवीन भूगर्भीय मॉडेल्सचा अभ्यास करून त्यांनी पुन्हा एकदा जोखीम पत्करून खोदकाम सुरू केले आणि अखेर हे उद्दिष्ट साध्य केले.

हेही वाचा – Drone Attack : इराणच्या आत्मघाती ड्रोनचा कुवेत विमानतळावर भीषण हल्ला! एका भारतीय प्रवाशाचा मृत्यू, 63 जण जखमी; थरारक व्हिडिओ व्हायरल

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मिळणार का बळ?
या अभूतपूर्व शोधामुळे पाकिस्तानच्या स्थानिक तेल आणि वायू उत्पादनाला मोठी गती मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या परकीय चलना तुटवड्याशी झगडणाऱ्या पाकिस्तानला यामुळे महागड्या इंधन आयातीपासून काहीसा दिलासा मिळू शकतो. स्वतःच्या देशातील ऊर्जेचे स्त्रोत बळकट झाल्यामुळे भविष्यात या भागात आणखी नवीन विहिरी शोधण्याचा मार्ग मोकळा झाला असून, यामुळे पाकिस्तानच्या ऊर्जा सुरक्षेला नवीन बळ मिळेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number