100 वर्षांचं रासायनिक गूढ उकललं! फ्रान्स अन् जपानच्या शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

रासायनिक रेणूंमधील (Molecules) गूढ 'आरशातील प्रतिमेसारख्या' (Mirror-image) रचना समजून घेण्याच्या आणि या क्षेत्रात अत्यंत उत्कृष्ट रासायनिक अभिक्रिया विकसित करण्याच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी या दोन दिग्गज शास्त्रज्ञांचा गौरव करण्यात आला आहे.

100 वर्षांचं रासायनिक गूढ उकललं! फ्रान्स अन् जपानच्या शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर
Chemistry Nobel Prize

Chemistry Nobel Prize 2026 : रसायनशास्त्र क्षेत्रातील या वर्षाचा प्रतिष्ठित नोबेल पुरस्कार फ्रान्समध्ये जन्मलेले 95 वर्षीय ज्येष्ठ शास्त्रज्ञ हेन्री बी. कागन आणि जपानचे शास्त्रज्ञ केन्सो सोई यांना संयुक्तपणे जाहीर झाला आहे. रासायनिक रेणूंमधील (Molecules) गूढ ‘आरशातील प्रतिमेसारख्या’ (Mirror-image) रचना समजून घेण्याच्या आणि या क्षेत्रात अत्यंत उत्कृष्ट रासायनिक अभिक्रिया विकसित करण्याच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी या दोन दिग्गज शास्त्रज्ञांचा गौरव करण्यात आला आहे. स्टॉकहोम, स्वीडन येथे नोबेल समितीने बुधवारी या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली.

‘होमोकायरालिटी’च्या कोड्याची उकल

नोबेल समितीच्या मते, गेल्या एका शतकाहून अधिक काळापासून वैज्ञानिकांसमोर असलेल्या एका जटिल रासायनिक कोड्याची उकल करण्यात या दोघांनी मोलाची भूमिका बजावली. रसायनशास्त्र नोबेल समितीचे अध्यक्ष हेनर लिंके यांनी सांगितले की, हेन्री कागन आणि केन्सो सोई यांनी ‘होमोकायरालिटी’ (Homochirality) म्हणजे जिथे रासायनिक रचना एकाच प्रकारच्या आरशातील प्रतिमांच्या स्वरूपात अस्तित्वात असतात, ती प्रक्रिया आपोआप कशी घडते हे सिद्ध करून दाखवले आहे. त्यांनी विकसित केलेल्या या रासायनिक अभिक्रिया विज्ञान जगतात मैलाचा दगड ठरल्या आहेत.

फ्रान्स आणि जपानमधील विद्यापीठांशी संलग्नता

95 वर्षीय हेन्री बी. कागन हे फ्रान्समधील ऑर्से येथील ‘युनिव्हर्सिटी पॅरिस-सुद’ (Université Paris-Sud) शी संलग्न आहेत, तर केन्सो सोई हे जपानमधील ‘टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स’मध्ये आपले संशोधन कार्य करत आहेत. नोबेल समितीचा फोन आला तेव्हा आपण घराबाहेर खरेदीसाठी गेलो होतो, अशी रंजक प्रतिक्रिया केन्सो सोई यांनी दिली. यावर्षी प्रत्येक पुरस्काराची रक्कम 1 कोटी 20 लाख स्वीडिश क्रोनर (सुमारे 11.6 कोटी रुपये) इतकी ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा – भौतिकशास्त्रात अंटार्क्टिकातील संशोधनाचा डंका! फ्रान्सिस हल्झेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर

नोबेल पुरस्कारांची साखळी आणि गेल्या वर्षीचा आढावा

यावर्षीच्या नोबेल पुरस्कारांची सुरुवात सोमवारी वैद्यकशास्त्राने झाली, ज्यामध्ये मेंदूच्या कार्यासाठी प्रकाशाचा वापर करणाऱ्या तंत्रज्ञानाचा सन्मान करण्यात आला. मंगळवारी भौतिकशास्त्रातील पुरस्कार न्यूट्रिनो संशोधनासाठी फ्रान्सिस हॅल्झेन यांना देण्यात आला. आगामी दिवसांत गुरुवारी साहित्यातील, शुक्रवारी शांततेचा आणि सोमवारी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर केला जाणार आहे. गेल्या वर्षी रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार वातावरणातील हरितगृह वायू शोषून घेणाऱ्या नवीन रेणू-रचना विकसित करणाऱ्या तीन शास्त्रज्ञांना संयुक्तपणे प्रदान करण्यात आला होता.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number