Thursday, February 12, 2026 03:08:28 AM

Plane Crash : अजित पवारांच्या विमान अपघाताशी साम्य असलेली आणखी एक दुर्घटना; खासदारासह 15 जणांचा करुण अंत

या भीषण दुर्घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यात विमानाचे अवशेष विखुरलेले दिसत आहेत. विमानाने उड्डाण केल्यानंतर साधारण 12 मिनिटांनी संपर्क तुटला होता.

plane crash  अजित पवारांच्या विमान अपघाताशी साम्य असलेली आणखी एक दुर्घटना खासदारासह 15 जणांचा करुण अंत

Colombia Plane Crash : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. त्याच दिवशी म्हणजे बुधवारी, 28 जानेवारी 2026 रोजी आणखी एक अशाच प्रकारचा विमान अपघात झाला. लँडिंगच्या वेळी विमान कोसळून एका खासदारासह 15 जण मृत्युमुखी पडले. जाणून घेऊ, कुठे आणि कशी घडली ही दुर्घटना..

कोलंबियामध्ये एका लहान प्रवासी विमानाचा भीषण अपघात झाला. उत्तर सँटँडर प्रांतातील ग्रामीण भागात हे विमान लँडिंगच्या काही मिनिटे आधी कोसळले. या दुर्घटनेत एका कोलंबियन खासदारासह एकूण 15 जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारी मालकीच्या 'सॅटेना एअरलाईन्स' (Satena Airlines) द्वारे चालवले जाणारे हे 'बीचक्राफ्ट-1900' (Beechcraft 1900) विमान होते. कॅमिलो डाझा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी (ATC) संपर्क तुटला आणि काही वेळातच विमानाचे अवशेष डोंगराळ भागात सापडले.

खासदार आणि उमेदवाराचा मृत्यू
या विमान अपघातामध्ये कोलंबियन संसदेचे (House of Representatives) 36 वर्षीय सदस्य डायोजेनेस क्विंटेरो (Diogenes Quintero) यांचा मृत्यू झाला आहे. क्विंटेरो हे त्यांच्या भागातील मानवाधिकार चळवळीतील एक मोठे नाव होते. त्यांच्यासोबतच आगामी निवडणुकीतील उमेदवार कार्लोस साल्सेडो यांचाही या अपघातात अंत झाला. विमानात एकूण 13 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्स होते. कोलंबियन हवाई मंत्रालयाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, अपघातात विमानातील एकाही व्यक्तीला वाचवता आले नाही.

हेही वाचा - Learjet-45 Private Plane : अजित पवारांनी अखेरचा प्रवास केलेलं 'लिअरजेट-45' नेमकं कसं होतं? पाहा तांत्रिक वैशिष्ट्ये

व्हिडीओ व्हायरल आणि तपासाचे आदेश
या भीषण दुर्घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यात विमानाचे अवशेष विखुरलेले दिसत आहेत. विमानाने उड्डाण केल्यानंतर साधारण 12 मिनिटांनी संपर्क तुटला होता. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना प्रकट केल्या आहेत. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, लँडिंगच्या वेळी हवामान अत्यंत खराब होते, ज्यामुळे वैमानिकाचे नियंत्रण सुटले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्रातील अपघाताशी साधर्म्य
योगायोगाने ही घटना त्याच दिवशी घडली, ज्या दिवशी बारामतीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. तिकडे अजित पवारांसह 6 जणांचा बळी गेला, तर इकडे कोलंबियातही एका महत्त्वाच्या नेत्यासह 15 जणांनी प्राण गमवावे लागले. दोन्ही घटनांमध्ये 'लँडिंग'च्या वेळीच अपघात झाला असल्याने विमान प्रवासाच्या सुरक्षेबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाकडून या अपघाताची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

हेही वाचा - Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत महत्त्वाची माहिती समोर; विमानात ‘गगन’ प्रणाली नव्हती? फक्त 28 दिवसांनी..


सम्बन्धित सामग्री