Crude Oil Prices: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या युद्धबंदीवर इराण आणि इस्रायल सहमत झाले आहेत. त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर दिसून येत आहे. ब्रेंट क्रूड ऑइल फ्युचर्स आणि यूएस डब्ल्यूटीआयमध्ये मोठी घसरण झाली आहे. या घोषणेनंतर, डॉलर कमकुवत झाला असून जपानपासून वॉल स्ट्रीटपर्यंतच्या शेअर्सच्या किमती वाढू लागल्या. कच्च्या तेलाच्या किमती 4% ने घसरून 65.75 डॉलर प्रति बॅरलवर आल्या.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या युद्धबंदीच्या घोषणेला मंगळवारी इस्रायल आणि इराण यांनी पूर्ण युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. जर दोन्ही बाजूंनी शांतता राखली तर युद्ध अधिकृतपणे 24 तासांनंतर संपेल. ज्यामुळे 12 दिवस चाललेला दोन्ही देशातील संघर्ष संपणार आहे. ट्रम्प म्हणाले की दोन्ही देशांमधील संघर्ष संपवण्याच्या उद्देशाने 'पूर्ण आणि व्यापक' युद्धबंदी लागू केली जाईल.
हेही वाचा - इराण-इस्रायल युद्धादरम्यान एअर इंडियाने जारी केला विशेष सल्लागार
ओपेकमधील तिसऱ्या क्रमांकाचा कच्च्या तेलाचा उत्पादक देश असलेला इराण तणाव कमी झाल्यामुळे आणि पुरवठ्यातील व्यत्यय टाळल्याने तेल निर्यात वाढवू शकतो. तेलाच्या किमतींमध्ये अलिकडच्या काळात वाढ होण्याचे हे सर्वात मोठे कारण बनले होते. या संदर्भात, आयजी विश्लेषक टोनी सायकॅमोर यांनी रॉयटर्सला सांगितले की युद्धबंदीच्या बातमीने, गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमतींमधील जोखीम प्रीमियम जवळजवळ पूर्णपणे नाहीसा झाल्याचे दिसून येते.
हेही वाचा - 'युद्धविराम आता सुरू झाला आहे, तो मोडू नका'; ट्रम्प यांचे इराण आणि इस्रायलला आवाहन
मध्यपूर्वेत इराण आणि इस्रायलमधील वाढता तणाव संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय ठरला होता. दोन्ही देशातील युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती, ज्यामुळे जगभरात चिंता वाढली. भारत त्याच्या तेलाच्या गरजेच्या 85% आयातीवर अवलंबून आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ओमान आणि इराण दरम्यान स्थित आहे. हा जगातील सर्वात व्यस्त आणि धोरणात्मक तेल वाहतूक मार्गांपैकी एक आहे. सौदी अरेबिया, इराक, कुवेत आणि संयुक्त अरब अमिराती सारख्या प्रमुख तेल उत्पादक देशांमधून कच्चे तेल या मार्गाने निर्यात केले जाते.