वॉशिंग्टन: इराणसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऊर्जा क्षेत्रात मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या मते, अमेरिकेत तब्बल 50 वर्षांनंतर नवा तेल शुद्धीकरण प्रकल्प म्हणजेच ऑइल रिफायनरी उभारली जाणार आहे. विशेष म्हणजे टेक्सास राज्यातील ब्राउनसव्हिल येथे उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात भारतातील आघाडीची खासगी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज गुंतवणूक करणार असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
मंगळवारी उशिरा रात्री सामाजिक माध्यम ट्रूथ वर या प्रकल्पाची माहिती देताना ट्रम्प यांनी हा करार अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या गुंतवणुकांपैकी एक असल्याचे म्हटले. त्यांच्या मते, सुमारे 300 अब्ज डॉलर खर्चाच्या या प्रकल्पामुळे अमेरिकेच्या ऊर्जा उत्पादन क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. ही रिफायनरी अमेरिका फर्स्ट रिफायनिंग या कंपनीमार्फत उभारली जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ट्रम्प यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “मला अभिमान आहे की टेक्सासमधील ब्राउनसव्हिल येथे गेल्या पाच दशकांनंतर पहिली नवी अमेरिकन तेल रिफायनरी उभारली जात आहे.” त्यांनी या गुंतवणुकीसाठी भारतातील भागीदारांचे, विशेषतः देशातील सर्वात मोठ्या खासगी ऊर्जा कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे आभारही मानले. मात्र या घोषणेबाबत रिलायन्स इंडस्ट्रीजकडून अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
ही प्रस्तावित रिफायनरी ब्राउनसव्हिल पोर्ट परिसरात उभारली जाणार आहे. हा बंदर अमेरिकेच्या गल्फ कोस्ट भागातील महत्त्वाच्या जहाजवाहतूक केंद्रांपैकी एक मानला जातो. या प्रकल्पामुळे अमेरिकेच्या देशांतर्गत बाजाराला इंधन पुरवठा वाढण्यास मदत होईल तसेच आंतरराष्ट्रीय ऊर्जा निर्यातीतही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ट्रम्प यांनी या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य सांगताना दावा केला की, पर्यावरणीय निकषांच्या दृष्टीने ही रिफायनरी अत्यंत प्रगत तंत्रज्ञानावर आधारित असेल. त्यांच्या मते, ती जगातील सर्वात स्वच्छ आणि आधुनिक रिफायनरींपैकी एक ठरू शकते. या प्रकल्पामुळे हजारो रोजगार निर्माण होतील आणि दक्षिण टेक्सास प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आर्थिक हालचाल वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या गुंतवणुकीला ट्रम्प यांनी आपल्या आर्थिक धोरणांशीही जोडले. त्यांच्या मते, परवानगी प्रक्रिया सुलभ करणे, करांमध्ये कपात करणे आणि ‘अमेरिका फर्स्ट’ या धोरणामुळे अमेरिकेत पुन्हा मोठ्या गुंतवणुकी आकर्षित होत आहेत. त्यामुळे ऊर्जा क्षेत्रासह विविध उद्योगांमध्ये अब्जावधी डॉलरचे नवे प्रकल्प देशात येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.