Tuesday, November 11, 2025 11:07:20 PM

Donald Trump: अमेरिकेच्या अण्वस्त्र चाचण्या पुन्हा सुरू; ट्रम्प म्हणाले “इतर देश करतात, मग आम्ही का थांबायचं?”

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अण्वस्त्र चाचण्या पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे जागतिक तणाव आणि अण्वस्त्र शर्यत वाढू शकते.

donald trump अमेरिकेच्या अण्वस्त्र चाचण्या पुन्हा सुरू ट्रम्प म्हणाले “इतर देश करतात मग आम्ही का थांबायचं”

वॉशिंग्टन (अमेरिका): अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं की अमेरिका लवकरच अण्वस्त्र चाचण्या पुन्हा सुरू करणार आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच पेंटागॉनला तात्काळ या चाचण्या सुरू करण्याचे निर्देश दिले होते. या निर्णयामुळे शीतयुद्धानंतर पहिल्यांदाच अमेरिका प्रत्यक्ष अण्वस्त्र चाचणी घेणार आहे. ट्रम्प यांनी विमानातून पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले, “तुम्हाला लवकरच कळेल, आम्ही काही चाचण्या करणार आहोत. इतर देश चाचण्या करत असतील, तर आम्हीही मागे राहणार नाही. अमेरिका सज्ज आहे.”

त्यांनी पुढे म्हटलं की, “इतर देशांकडे अण्वस्त्र चाचणीचे स्वातंत्र्य आहे, मग आम्ही थांबायचं का?” बुधवारी ट्रम्प यांनी चीन आणि रशिया यांच्या बरोबरीने अण्वस्त्र चाचण्या सुरू करण्याचे आदेश दिले. सोशल मेडियावर त्यांनी लिहिले, “अमेरिकेकडे जगातील सर्वाधिक अण्वस्त्रं आहेत. माझ्या पहिल्या कार्यकाळात सर्व शस्त्रांचे आधुनिकीकरण पूर्ण केले. मला या चाचण्या आवडत नाहीत, पण इतर देश करत असतील तर आम्हाला देखील तयार राहावे लागेल.” ही घोषणा त्यांनी दक्षिण कोरियामध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत होणाऱ्या व्यापार बैठकीच्या अगोदर केली. पत्रकारांनी या निर्णयाबाबत विचारले असता ट्रम्प म्हणाले, “इतर सर्व देश चाचण्या करत आहेत. आम्ही वर्षानुवर्षे थांबलो आहोत. आता योग्य वेळ आली आहे की अमेरिका देखील पुन्हा चाचण्या सुरू करेल.”

हेही वाचा: Pakistan Islamabad Airport: कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला पाकिस्तान; इस्लामाबाद विमानतळ यूएईला विकणार

अमेरिकेने 1945 ते 1992 या काळात एकूण 1,054 अण्वस्त्र चाचण्या केल्या, त्यापैकी बहुतेक नेवाडा राज्यात झाल्या. वाढत्या पर्यावरणीय चिंतेमुळे आणि शीतयुद्धातील तणावामुळे 1992 मध्ये या चाचण्या थांबवण्यात आल्या. 1974 मध्ये ‘थ्रेशहोल्ड टेस्ट बॅन ट्रीटी’ अंतर्गत भूमिगत चाचण्या 150 किलोटन मर्यादेत ठेवण्यात आल्या होत्या. 1997 मध्ये राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी ‘कंप्रीहेन्सिव्ह टेस्ट बॅन ट्रीटी’ (CTBT) वर स्वाक्षरी केली, पण अमेरिकन सिनेटने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव ती मान्य केली नाही.

सध्या अमेरिकेने या करारावर स्वाक्षरी केलेली असली तरी तीने त्याची औपचारिक मान्यता दिलेली नाही. त्यामुळे कायद्याने ट्रम्प यांना चाचण्या सुरू करण्याचा अधिकार आहे. मात्र या निर्णयाने शीतयुद्धातील जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. काही नेत्यांनी या योजनेला विरोध करत ती सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक आणि जागतिक तणाव वाढवणारी ठरू शकते, असे म्हटले आहे. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेला नव्या चाचण्यांची तांत्रिक गरज नाही, कारण विद्यमान अण्वस्त्रांचा साठा आधीच आधुनिक सिम्युलेशनद्वारे सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे. प्रत्येक चाचणीसाठी सुमारे 140 दशलक्ष डॉलर खर्च अपेक्षित आहे. विश्लेषकांच्या मते, या निर्णयामुळे जागतिक अण्वस्त्र शर्यत पुन्हा सुरू होऊ शकते आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय शांततेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

हेही वाचा: Aadhaar Card New Rules: आजपासून आधारकार्डमधील हे नियम बदलणार, नेमकं काय होणार?


सम्बन्धित सामग्री