अमेरिका आणि इराणमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या नौदल प्रमुख जॉन फेलन यांना पदावरून हटवण्यात आले आहे. पेंटागनने 23 एप्रिल 2026 रोजी याची अधिकृत पुष्टी केली असून हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे.
दरम्यान, इराणसोबत सुरू असलेल्या चर्चांबाबत ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, युद्ध संपवण्यासाठी कोणतीही वेळेची मर्यादा निश्चित केलेली नाही. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी “युद्ध संपवण्याची घाई नाही” असे सांगत अल्पकालीन युद्धविरामाच्या चर्चांना “अफवा” असे संबोधले.
ट्रम्प यांनी हेही स्पष्ट केले की, आगामी निवडणुका लक्षात घेऊन युद्ध लवकर संपवण्याचा कोणताही राजकीय दबाव नाही. “आमचा उद्देश अमेरिकन जनतेसाठी सर्वोत्तम करार करणे आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी युद्धाच्या कालावधीचा राजकीय फायद्याशी काहीही संबंध नसल्याचेही स्पष्ट केले.
हेही वाचा: Baramati ByElection: बारामती, राहुरी विधानसभा पोटनिवडणूक; मतदानाला सुरूवात, काय आहे सध्या स्थिती अन् मतदारराजा कोणाला निवडणार?
दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनीतील परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली आहे. इराणने काही जहाजांवर गोळीबार करून त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ट्रम्प यांनी सांगितले की ही जहाजे अमेरिकेची नव्हती, त्यामुळे तातडीचा धोका नाही, पण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
अहवालानुसार, 28 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झालेल्या या संघर्षामुळे ट्रम्प प्रशासनावर राजकीय दबाव वाढत आहे. विशेषतः रिपब्लिकन पक्षाच्या काही सदस्यांकडूनही या युद्धावर टीका होत आहे.
होर्मुझ सामुद्रधुनी हा जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. इराणने येथे नियंत्रण वाढवल्याने जागतिक तेल बाजारावर परिणाम झाला असून इंधन दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या संघर्षाचा परिणाम केवळ अमेरिकेपुरता मर्यादित न राहता जागतिक अर्थव्यवस्थेवरही होताना दिसत आहे.
हेही वाचा: LSG Vs RR IPL 2026: लखनऊ सुपर जायंट्सचा फ्लॉप शो! 159 धावांचा पाठलाग करताना दाणादाण; राजस्थान रॉयल्सची विजयी घोडदौड