Elon Musk Instagram Girls Comment: टेस्ला आणि ‘एक्स’चे प्रमुख एलॉन मस्क यांनी ‘मेटा’च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. ‘इन्स्टाग्राम हे मुलींसाठी आहे’, असे म्हणत मस्क यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. 1 ऑक्टोबर रोजी व्हेंचर कॅपिटलिस्ट गाइगर कॅपिटल यांनी इन्स्टाग्राम हे महिलाकेंद्रित ॲप असल्याचे सांगत आपले खाते हटवल्याची पोस्ट केली होती. या पोस्टवर प्रतिक्रिया देताना मस्क यांनी केलेली ही टिप्पणी काही वेळातच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. यापूर्वी मे महिन्यातही त्यांनी अशाच स्वरूपाचे वक्तव्य करून इन्स्टाग्राम आणि पुरुषांच्या वापराबाबत थट्टा उडवली होती, ज्यामुळे लिंगभेदाच्या रूढ कल्पनांवरून मोठा वाद निर्माण झाला होता. आताही मस्क यांनी पुन्हा एकदा महिला आणि इन्स्टाग्रामवर त्याच रूढीवादी दृष्टीकोनातून टिप्पणी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
‘थ्रेड्स’ आणि ‘एक्स’मधील स्पर्धा अधिक तीव्र
मस्क यांची ही ताजी टीका ‘एक्स’ आणि मार्क झुकरबर्ग यांच्या ‘मेटा’मधील दीर्घकालीन व्यावसायिक स्पर्धेशी जोडली जात आहे. जुलै 2023 मध्ये मेटाने ‘थ्रेड्स’ हे टेक्स्ट-आधारित प्लॅटफॉर्म सादर केले होते, जे थेट ‘एक्स’ला आव्हान देणारे ठरले. इन्स्टाग्रामशी थेट जोडलेले असल्याने थ्रेड्सला अल्पावधीतच मोठा वापरकर्ता वर्ग मिळाला. या घडामोडींनंतर मस्क आणि झुकरबर्ग यांच्यातील शाब्दिक युद्ध वारंवार पाहायला मिळाले आहे.
Officially deleted instagram. An inherently female app. Zero benefit. — Geiger Capital (@Geiger_Capital) October 1, 2026
हेही वाचा – परदेशात बॉलिवूड अभिनेत्रीचा भयानक अपघात; चाहत्यांची चिंता वाढली
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शर्यतीतही दोन्ही दिग्गज आमनेसामने
केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित न राहता ही स्पर्धा आता एआय (AI) क्षेत्रातही वेगाने पसरली आहे. मस्क यांची ‘एक्सएआय’ (xAI) कंपनी आणि मेटाचे एआय विभाग या तंत्रज्ञानात आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या स्पर्धेत पकड मजबूत करण्यासाठी 2025 मध्ये मस्क यांनी ‘एक्स’ आणि ‘एक्सएआय’चे एकत्रीकरण करत दोन्ही व्यवसाय एकाच छताखाली आणले होते.
मस्क यांच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
मस्क यांच्या या विधानावर सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून तीव्र आणि संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही समर्थकांनी ‘एक्स हे मुलींसाठी आहे’ असे सांगत मस्क यांच्या भूमिकेचे समर्थन केले, तर अनेकांनी त्यांच्यावर कडक शब्दांत टीका केली. इन्स्टाग्राम हे सर्व लिंगांच्या व्यक्तींसाठी खुले, सर्वसमावेशक आणि सकारात्मक व्यासपीठ असल्याचे सांगत युजर्सनी मस्क यांना ट्रोल केले; तर काहींनी स्वतःचे खाते तयार केल्यानंतर मस्क यांना ही जाणीव झाली असावी, अशी उपरोधिक टोलेबाजीही केली.
हेही वाचा – आकाशात कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं? फ्लाय दुबईच्या विमानामधील प्लंबरने सांगितला थरार
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.