Helicopter Crash: अमेरिकेतून एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. लग्नाचा आनंदोत्सव सुरू असतानाच, काही तासांनंतर हनिमूनसाठी निघालेल्या एका भारतीय वंशाच्या नवविवाहित पायलटचा जॉर्जियामध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. डेल्टा एअर लाइन्समध्ये कार्यरत असलेला आणि मूळचा केरळचा रहिवासी असलेला डेव्ह फिजी (वय 25) या अपघातात ठार झाला. त्याच्यासोबत हेलिकॉप्टरच्या मुख्य पायलटचाही या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र, या भीषण अपघातातून डेव्हची पत्नी सुदैवाने बचावली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जंगलात कोसळले हेलिकॉप्टर
डेव्ह आणि जेसनी यांचा विवाह डॉसनविल येथील 'द रिव्हियर' या ठिकाणी शेकडो पाहुण्यांच्या उपस्थितीत अत्यंत थाटामाटात पार पडला होता. लग्नविधी आटोपल्यानंतर डाउनटाउन अटलांटा येथील एका हॉटेलमध्ये रात्र घालवण्यासाठी या नवविवाहित जोडप्याला एका विशेष हेलिकॉप्टर उड्डाणाद्वारे निरोप देण्यात आला. ते 5 आसनी 'रॉबिन्सन R66' या हेलिकॉप्टरमधून डेकाल्ब-पीचट्री विमानतळाकडे जाण्यासाठी निघाले होते. परंतु, हे हेलिकॉप्टर गंतव्यस्थानी पोहोचण्यापूर्वीच लग्नाच्या ठिकाणाजवळ असलेल्या सुमारे 10,000 एकरच्या वन्यजीव व्यवस्थापन क्षेत्रातील घनदाट जंगलात कोसळले.
6 तास ढिगाऱ्याखाली अडकली होती पत्नी
अपघातानंतर घनदाट जंगल असल्यामुळे बचाव पथकाला दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर शोधण्यात बराच वेळ लागला. डेव्हचे वडील जॉर्ज फिजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथक पोहोचण्यापूर्वी डेव्हची पत्नी जेसनी तब्बल 6 तास हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडली होती. जेसनीने सांगितले की, जेव्हा तिला शुद्ध आली, तेव्हा तिचा पती डेव्ह तिच्या शेजारीच शांत पडला होता. जेसनी स्वतः पेशाने परिचारिका (नर्स) असल्याने, डेव्हचे शरीर पूर्णपणे गार पडल्याचे त्याचा मृत्यू झाल्याचे तिला तात्काळ समजले.
पत्नीला मोठा मानसिक धक्का मोठा
या भीषण अपघातात जेसनीच्या शरीरावर काही ठिकाणी कापल्याच्या जखमा झाल्या आहेत आणि मुका मार लागला आहे; मात्र सुदैवाने तिचे कोणतेही हाड मोडलेले नाही. पतीच्या अचानक जाण्याने ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडली असून सध्या रुग्णालयात तिच्यावर उपचार आणि समुपदेशन सुरू आहे. डेव्ह आणि जेसनी हे दक्षिण कॅरोलिना आणि जॉर्जिया दरम्यान एका चर्चच्या माध्यमातून भेटले होते आणि मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात होऊन त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट; तपास सुरू
हा अपघात नक्की कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अमेरिकेचे 'नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड' (NTSB) या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहे. तांत्रिक बिघाड किंवा हवामानातील बदल यांपैकी कोणत्या कारणामुळे हेलिकॉप्टर कोसळले, याचा शोध सध्या घेतला जात आहे.