Strait of Hormuz: मध्यपूर्वेतील वाढता तणाव आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराणचे वाढते वर्चस्व लक्षात घेता, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात (UAE) आणि जॉर्डन या आखाती देशांनी एक क्रांतिकारी पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत. तेल निर्यातीसाठी इराणच्या नियंत्रणाखालील समुद्री मार्गावरील अवलंबित्व संपवण्यासाठी हे देश आता थेट इस्रायलच्या हैफा बंदरामार्फत कच्च्या तेलाची निर्यात करण्याची योजना आखत आहेत. विशेष म्हणजे, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या मालकीच्या हैफा बंदराला जागतिक व्यापारात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे.
होर्मुझच्या धोक्याला 'हैफा'चा पर्याय
'फायनान्शियल टाइम्स'ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, आखाती देश त्यांच्या तेल पाइपलाइन नेटवर्कची पुनर्रचना करण्याच्या तयारीत आहेत. सध्या पर्शियन आखातातील होर्मुझची सामुद्रधुनी हा तेल वाहतुकीसाठी सर्वात महत्त्वाचा पण अत्यंत संवेदनशील मार्ग आहे. हा धोका टाळण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सुचवलेल्या पर्यायावर आता वेगाने काम सुरू आहे. या योजनेनुसार, अरबी द्वीपकल्पाला थेट भूमध्य समुद्राशी जोडणारा व्यापारी मार्ग विकसित केला जाईल, ज्याचे मुख्य केंद्र इस्रायलमधील हैफा बंदर असेल.
अदानी समूहाचा मोठा फायदा
या संपूर्ण घडामोडींचा सर्वात मोठा फायदा भारताच्या अदानी समूहाला होणार आहे. हैफा बंदराचे व्यवस्थापन अदानी-गाडोट समूहाकडे असून यामध्ये अदानींची 70 टक्के हिस्सेदारी आहे. या समूहाकडे सन 2054 पर्यंत हे बंदर चालवण्याचा परवाना आहे. हे इस्रायलचे दुसरे सर्वात मोठे बंदर असून देशातील अर्ध्याहून अधिक कंटेनर वाहतूक येथूनच होते. जर आखाती देशांचे तेल या बंदरामार्फत युरोप आणि इतर देशांकडे रवाना झाले, तर अदानी समूहाच्या जागतिक महसुलात आणि प्रतिष्ठेत मोठी वाढ होणार आहे.
आयएमईसी (IMEC) प्रकल्पाला मिळणार गती
हा प्रकल्प केवळ तेल पाइपलाइनपुरता मर्यादित नसून, तो अमेरिकेच्या नेतृत्वाखालील भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडोर (IMEC) उपक्रमाचा भाग मानला जात आहे. यामध्ये रस्ते, रेल्वे आणि पाइपलाइनच्या माध्यमातून भारताला थेट भूमध्य समुद्राशी जोडण्याचे उद्दिष्ट आहे. सौदी अरेबियाची 'ईस्ट-वेस्ट पाइपलाइन' सध्या लाल समुद्रापर्यंत तेल पोहोचवते, मात्र आता त्याचे जाळे थेट इस्रायलपर्यंत विस्तारण्याचे नियोजन आहे. लेबनीज कंपनी 'कॅट ग्रुप'ला यासंदर्भात अनेक चौकशी प्रस्ताव प्राप्त झाले असून, कामाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – India Oil Supply : होर्मुज नाही तर नाही; भारतासाठी हा नवा मार्ग ठरणार लाइफलाईन, पण..
इराणच्या नाकेबंदीला प्रत्युत्तर
इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी स्पष्ट केले की, इराणच्या भौगोलिक अडथळ्यांना आणि नाकेबंदीला पाइपलाइन हाच एकमेव दीर्घकालीन उपाय आहे. तेलवाहिन्यांचे मार्ग पश्चिमेकडे वळवून तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्रापर्यंत पोहोचल्यास इराणचा प्रभाव कमी होईल. "आपल्या मित्रांच्या सहकार्याने स्वतःचे भवितव्य ठरवण्यासाठी भूमध्य समुद्रापर्यंत पाइपलाइन विस्तारणे आवश्यक आहे," असे मत इस्रायली ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास आखाती देश, इस्रायल आणि भारत यांच्यातील त्रिकोणी व्यापारी संबंध एका नव्या उंचीवर पोहोचतील.