Israel-Hamas War: मध्यपूर्वेतील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेली पुढाकार आता अडचणीत आला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष संपवण्यासाठी ट्रम्प यांनी तयार केलेल्या 20 कलमी शांतता करारावर दोन्ही पक्षांनी सुरुवातीला सहमती दर्शवली होती. मात्र, आता हमासने करारावर सही करण्यास नकार दिल्याने ट्रम्प यांच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. हमासच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले की, 'जर इस्रायलसोबत पुन्हा युद्ध करावं लागलं, तर आम्ही तयार आहोत.' या विधानानंतर शांततेच्या दिशेने सुरू असलेली प्रक्रिया पुन्हा धोक्यात आली आहे.
हमासच्या राजकीय ब्युरोचे सदस्य होसम बदरान यांनी वृत्तसंस्था एएफपीशी बोलताना सांगितले की, ट्रम्प यांच्या प्रस्तावातील काही अटी हमासला मान्य नाहीत. विशेषतः, गाझा पट्टी रिकामी करणे आणि शस्त्रास्त्रं टाकून देणे या अटींना त्यांनी स्पष्ट विरोध दर्शवला आहे. बदरान यांनी म्हटलं आहे की, आम्ही या चर्चांमध्ये कतार आणि इजिप्त या देशांच्या मध्यस्थीद्वारे सहभागी आहोत, परंतु अधिकृतपणे सही करण्याच्या प्रक्रियेत आम्ही भाग घेणार नाही. त्यांनी स्पष्ट केले की, आमच्याकडे असलेली शस्त्रं ही पॅलेस्टिनी नागरिकांच्या संरक्षणासाठी आहेत. त्यामुळे ती सोडण्याचा प्रश्नच येत नाही.
हेही वाचा - Abhijit Banerjee : नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी पत्नीसह अमेरिका सोडणार; 'ट्रम्प धोरणांचा' फटका? 'या' देशात विकास अर्थशास्त्राचे नवे केंद्र उभारणार
या घडामोडी ट्रम्प यांच्या शांततेच्या प्रयत्नांसाठी मोठा अडथळा ठरत आहेत. मूळ योजनेनुसार, 13 ऑक्टोबरपासून कराराची अंमलबजावणी सुरू होणार होती. त्यानुसार, इस्रायलने आपल्या कैदेत असलेल्या 2000 पॅलेस्टिनी नागरिकांना मुक्त करण्याचं ठरवलं होतं, तर हमासने 20 इस्रायली बंदकांना सोडवण्याची तयारी दर्शवली होती. पण हमासच्या नव्या भूमिकेमुळे आता संपूर्ण प्रक्रिया थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा - Pakistan Afghanistan War: अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर हल्ला; 58 पाकिस्तानी सैनिक ठार, 25 चौक्या ताब्यात
राजकीय तज्ज्ञांच्या मते, हमासचा हा निर्णय ट्रम्प यांच्या मध्यस्थीवरील विश्वासाला मोठा धक्का देणारा आहे. इस्रायल-हमास युद्ध संपवण्यासाठीचा हा करार ट्रम्पसाठी महत्त्वाचा राजनैतिक विजय ठरू शकला असता. मात्र आता या करारावर अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत. हमासच्या या नकारामुळे मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता असून, ट्रम्प यांच्यासमोर नवे राजनैतिक आव्हान उभे राहिले आहे.