Saturday, March 07, 2026 03:09:02 AM

Supreme Leader of Iran: इराणमध्ये ऐतिहासिक सत्तापालट; सर्वोच्च नेतेपदी खामेनीचे चिरंजीव मोजतबा खामेनी यांची नियुक्ती

अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणमधील नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या तर्कवितर्कांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

supreme leader of iran इराणमध्ये ऐतिहासिक सत्तापालट सर्वोच्च नेतेपदी खामेनीचे चिरंजीव मोजतबा खामेनी यांची नियुक्ती

Supreme Leader of Iran: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर, त्यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांची इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इराणच्या तज्ज्ञ सभेने (Assembly of Experts) उत्तराधिकारी निवडीसाठी घेतलेल्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेतला. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणमधील नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या तर्कवितर्कांना आता पूर्णविराम मिळाला आहे. 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणमध्ये झालेला हा केवळ दुसरा नेतृत्व बदल आहे.

IRGC चा दबाव आणि ऐतिहासिक संक्रमण
'इराण इंटरनॅशनल' ने दिलेल्या वृत्तानुसार, मोजतबा खामेनी यांची निवड करताना इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चा मोठा दबाव होता. 1989 पासून इराणची सत्ता सांभाळणारे अली खामेनी हे मध्य पूर्वेतील सर्वात प्रदीर्घ काळ पद भूषवणारे राष्ट्रप्रमुख होते. त्यांच्या जागी आता मोजतबा यांच्याकडे इराणच्या युद्ध, शांतता आणि वादग्रस्त अणुकार्यक्रमासह सर्व महत्त्वाच्या निर्णयांचा अंतिम अधिकार असणार आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीला अली खामेनी यांनी आपल्या पुत्राला उत्तराधिकाऱ्यांच्या यादीतून वगळले होते, कारण शिया धर्मगुरूंच्या परंपरेत पिता-पुत्र संक्रमण सामान्यतः स्वीकारले जात नाही.

कोण आहेत मोजतबा खामेनी?
56 वर्षीय मोजतबा खमेनी हे मध्यम श्रेणीचे शिया धर्मगुरू आहेत. त्यांनी कधीही कोणतेही निवडून आलेले किंवा अधिकृत सरकारी पद भूषवलेले नाही, मात्र तरीही सत्ताव्यवस्थेत त्यांचा पडद्यामागून मोठा प्रभाव राहिला आहे. त्यांनी इराण-इराक युद्धादरम्यान सशस्त्र दलात सेवा बजावली होती. 1969 मध्ये मशहाद येथे जन्मलेले मोजतबा, त्यांचे वडील शाह राजवटीविरुद्ध सक्रिय असतानाच्या काळात वाढले. 2019 मध्ये अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने त्यांच्यावर निर्बंध लादले होते. अधिकृत पद नसतानाही ते वडिलांच्या वतीने महत्त्वाची कामे पाहत असल्याचे अमेरिकेने म्हटले होते.

हेही वाचा -  Indians Dead In Crisis: स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये भारताची मोठी कोंडी; 1100 भारतीयांचा जीव टांगणीला, तीन खलाशांचा मृत्यू झाल्याने खळबळ

खामेनींच्या मृत्यू आणि आखातातील वाढता तणाव
28 फेब्रुवारी रोजी झालेल्या अचूक हल्ल्यात अली खामेनी मारले गेल्याने संपूर्ण आखाती देशांत युद्धाचे ढग दाटले आहेत. इराणने या हल्ल्याचा बदला म्हणून कुवेत, बहरीन, कतार, सौदी आताबिया आणि यूएई मधील अमेरिका-इस्रायलच्या तळांना लक्ष्य करत क्षेपणास्त्रे डागली आहेत. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला आहे. परिस्थिती आणखी चिघळल्यास तेहरानवर अधिक निर्णायक हल्ला करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे, तर बहुतांश आखाती देशांनी इराणला संयम राखण्याचे आवाहन केले आहे.


सम्बन्धित सामग्री