Donald Trump on Hamas: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझातील हमासला कडक इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जर हमासने गाझावरील नियंत्रण सोडले नाही आणि अमेरिकेच्या मध्यस्थीने मांडलेल्या शांतता प्रस्तावाला मान्यता दिली नाही, तर त्याचा पूर्णतः नाश होईल. ट्रम्प यांनी हा इशारा सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत दिला असून, त्यांच्या वक्तव्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, 'हमास खरोखर शांतता इच्छिते की नाही हे आम्हाला लवकरच कळेल. पण जर त्यांनी हा प्रस्ताव नाकारला, तर ते स्वतःसाठी विनाशाचे दरवाजे उघडतील.' त्यांनी पुढे सांगितले की इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेच्या शांतता योजनेला पूर्ण पाठिंबा दिला आहे. बीबी (नेतान्याहू) यावर सहमत आहेत, असेही ट्रम्प यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा - Putin Warns Trump: पुतिन यांचा ट्रम्पला इशारा! म्हणाले, 'युक्रेनला टोमाहॉक क्षेपणास्त्रे पुरवल्यास रशिया-अमेरिका संबंध धोक्यात येऊ शकतात'
ट्रम्प प्रशासनाने गाझा संकटावर उपाय म्हणून नवीन शांतता योजना सादर केली आहे, ज्यामध्ये हमासने शस्त्रसंधी, कैद्यांची देवाणघेवाण आणि गाझातील नागरी प्रशासन इस्रायलसोबत समन्वयाने चालवण्याची तरतूद आहे. या योजनेला इस्रायलने सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी, हमासने अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही.
हेही वाचा - Israel Air Strike in Gaza: इस्रायलचा गाझावर हवाई हल्ला; 7 मुलांसह 70 नागरिकांचा मृत्यू
तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांचे हे वक्तव्य केवळ दबाव निर्माण करण्यासाठी असले तरी, या विधानामुळे इस्रायल-हमास संघर्षातील राजनैतिक समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत. आता हमासची प्रतिक्रिया काय असेल, यावर संपूर्ण मध्यपूर्वेतील देशांचे लक्ष लागले आहे.