Iran-US Conflict: इस्रायल आणि अमेरिकेसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. इराणी संसदेचे सभापती एम.बी. गालिबाफ यांनी थेट इशारा दिला आहे की, जर इराणच्या बेटांवर कोणताही हल्ला झाला, तर पर्शियन आखात आक्रमकांच्या रक्ताने लाल केले जाईल. ‘मातृभूमी किंवा मृत्यू!’ अशा शब्दांत त्यांनी आपला निर्धार व्यक्त करत अमेरिकन सैनिकांच्या जिवाची जबाबदारी ट्रम्प प्रशासनाची असेल, असे ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.
इराणी बेटांच्या संरक्षणासाठी सर्व मर्यादा ओलांडण्याची धमकी
इराणवर सुरू असलेल्या अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमुळे तेहरानमधील सत्ताधारी संतप्त आहेत. खार्ग बेटासह इतर मोक्याच्या बेटांवर आक्रमण करण्याचा किंवा ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यास इराण आपला सर्व संयम सोडून देईल, असे गालिबाफ यांनी म्हटले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, अशा स्थितीत इराण पूर्ण ताकदीनिशी प्रत्युत्तर देईल, ज्यामुळे पर्शियन आखातातील परिस्थिती अत्यंत भयावह होऊ शकते.
ऊर्जा संकट गहिरे; तेलाचे दर 100 डॉलर्सच्या पार
इराणने केवळ अमेरिका आणि इस्रायलच नव्हे, तर त्यांच्या मित्र राष्ट्रांवरील हल्लेही तीव्र केले आहेत. बहरीन, युएई, सौदी अरेबिया आणि इराकमधील बंदरांना लक्ष्य केले जात आहे. या संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीने प्रति बॅरल 100 डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. इराणने आखाती प्रदेशातील तेलवाहू जहाजे आणि ऊर्जा सुविधांवर केलेले हल्ले जागतिक अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत.
Homeland or Death! Any aggression against soil of Iranian islands will shatter all restraint. We will abandon all restraint and make the Persian Gulf run with the blood of invaders. The blood of American soldiers is Trump's personal responsibility. — محمدباقر قالیباف | MB Ghalibaf (@mb_ghalibaf) March 12, 2026
ट्रम्प प्रशासनाची ‘बिनशर्त आत्मसमर्पण’ची मागणी
दुसरीकडे, अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने इराणकडे ‘बिनशर्त आत्मसमर्पण’ करण्याची मागणी लावून धरली आहे. अमेरिकेचे भूदल इराणमध्ये उतरण्याची शक्यताही काही अहवालांमधून वर्तवण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने इराणला हल्ले थांबवण्याचे आवाहन करणारा ठराव मंजूर केला असला, तरी इराणने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. यामुळे येणाऱ्या काळात हे युद्ध अधिक भीषण वळण घेण्याची चिन्हे दिसत आहेत.