Imran Khan: इमरान खान जिवंत; बहिणीला भेटल्यानंतर केला मोठा दावा; म्हणाले, ‘कोठडी भट्टीसारखी…’

अडियाला तुरुंगातील भेटीत इमरान खान यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला.

Imran Khan: इमरान खान जिवंत; बहिणीला भेटल्यानंतर केला मोठा दावा; म्हणाले, ‘कोठडी भट्टीसारखी…’

Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान गेल्या काही महिन्यांपासून रावलपिंडीतील अडियाला तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. न्यायालयीन खटले, राजकीय संघर्ष आणि लष्करातील तणाव… या सगळ्यांच्या छायेत त्यांची तुरुंगातील स्थिती सातत्याने चर्चेत राहिली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मृत्यूबाबत अफवा पसरल्यानंतर वातावरण अधिकच तंग झाले होते. मात्र सोमवारी त्यांच्या बहिणीने भेट दिल्यानंतर पुन्हा एकदा मोठा खळबळजनक दावा समोर आला आहे.

इमरान खान यांच्या बहिणी उज्मा खातून यांनी सुमारे वीस मिनिटे त्यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, "भाऊ शारीरिकदृष्ट्या ठीक आहेत, पण मानसिक ताण प्रचंड आहे. त्यांना एकांतात ठेवले जात असून सर्व काही लष्करी एजन्सींच्या नियंत्रणाखाली असल्याचे ते म्हणाले."

उज्मा यांच्या म्हणण्यानुसार, इमरान खान यांनी भेटीदरम्यान स्वतःच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले. त्यांचे म्हणणे होते की त्यांना जाणीवपूर्वक एकटं केलं जात आहे, आणि वातावरण तापलेले असताना त्यांना कोणाशीही नीट संवाद साधू दिला जात नाही. तुरुंगातील कोठडी अत्यंत उष्ण असून “भट्टीसारखी तापते”, असा दावा त्यांनी केला आहे.

हेही वाचा: Japan Muslim Burial Issue: 'मुस्लिम मृतदेह मूळ देशातच पाठवावा…'; मुस्लिमांना दफनभूमीसाठी जागा देण्यास जपान सरकारने का दिला नकार?

इमरान खान यांनी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यावर थेट आरोप करत म्हटले की, "सरकार व लष्करी नेतृत्व मला बेकायदेशीरपणे कैद ठेवत आहे. माझ्या विरोधातील अनेक खटल्यांचे भवितव्य बदलू शकते आणि त्यानुसार मला लष्करी न्यायालयात हलवण्याची तयारी गुपचूप सुरू आहे. माझ्यावर काही प्रसंगी घडले, तर त्यासाठी असीम मुनीर व आयएसआय नेतृत्व जबाबदार असेल."

पीटीआय पक्षाकडूनही या भेटीनंतर अधिकृत निवेदन जारी करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, इमरान खान यांना मुलांशी बोलण्याची परवानगी नाही आणि त्यांना मृत्युदंडाची शिक्षा असलेल्या कैद्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये ठेवले जात आहे. पाच दिवस तुरुंगातील वीज खंडित झाल्याचाही त्यांनी आरोप केला. काही काळ त्यांना पिंजऱ्यासारख्या बंदिस्त जागेत ठेवण्यात आल्याचा दावा पक्षाने केला आहे.

इमरान खान यांनी भेटीत आणखी एक महत्त्वाची बाब स्पष्ट केली "मी दबावाखाली झुकणार नाही. पाकिस्तानमध्ये जर कायदा असेल, तर माझी सुनावणी न्यायाने व्हायला हवी. पण सध्या देशात ‘असीम कायदा’ चालू आहे. सत्याच्या लढाईत मी मागे हटणार नाही."

हेही वाचा: Android Phone Ban: 'या' देशाच्या सैन्यात Android Phone वर पूर्ण बंदी! सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी आता फक्त iPhone अनिवार्य

या सर्व आरोपांवर पाकिस्तान सरकार किंवा लष्कराने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, इमरान खान यांचे दावे आणि त्यांच्या बहिणीने दिलेली माहिती यामुळे देशाच्या राजकीय वातावरणात पुन्हा एकदा हलचल निर्माण झाली आहे. एका बाजूला इमरान यांच्या समर्थकांनी त्यांच्या सुरक्षा व न्याय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले, तर विरोधकांनी हे दावे राजकीय सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

तुरुंगातील परिस्थिती, लष्कराशी संघर्ष आणि राजकीय अनिश्चितता या तिन्हींच्या छायेत इमरान खान यांची पुढील काही दिवसांची घडामोड पाकिस्तानसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number