India China Flight: भारत आणि चीनमधील हवाई सेवा लवकरच सुरळीत होणार आहे. चायना ईस्टर्न एअरलाइनने 9 नोव्हेंबर 2025 पासून शांघाय आणि नवी दिल्ली दरम्यान राउंड-ट्रिप फ्लाइट्स पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. या मार्गावरील उड्डाणे दर बुधवार, शनिवार आणि रविवारी होणार आहेत. एअरलाइन या मार्गावर एअरबस A330-200 वाइड-बॉडी विमानांचा वापर करेल. त्यामुळे प्रवाशांना लांब पल्ल्याच्या प्रवासात अधिक आराम, वाय-फाय आणि उत्कृष्ट सेवांचा अनुभव मिळणार आहे.
नवी दिल्ली-शांघाय फ्लाइट वेळापत्रक
फ्लाइट MU563 शांघायहून दुपारी 12:50 वाजता उड्डाण घेईल आणि दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुपारी 5:45 वाजता पोहोचेल. तसेच फ्लाइट MU564 दिल्लीहून संध्याकाळी 7:55 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 4:10 वाजता शांघायला पोहोचेल. तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध असून, या सेवेमुळे व्यापार, शिक्षण, तंत्रज्ञान आणि पर्यटन क्षेत्रांना चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा - BrahMos: 'पाकिस्तानच्या जमिनीचा प्रत्येक इंच आमच्या ब्रह्मोसच्या आवाक्यात...'; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा
कनेक्टिव्हिटी व द्विपक्षीय संबंध मजबूत होणार
ऑगस्ट 2025 मध्ये तियानजिनमध्ये झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी निवडक शहरांमध्ये थेट उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली होती. चायना ईस्टर्न एअरलाइनने सांगितले की या निर्णयामुळे भारत-चीन कनेक्टिव्हिटी आणि व्यावसायिक संबंध अधिक बळकट होण्यास मदत होईल.
हेही वाचा - Pakistan vs Afghanistan : पाकिस्तानी हवाई हल्ल्यात 3 अफगाण क्रिकेटपटूंसह 6 ठार; रशीद खान संतापला, तिरंगी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय!
याआधी इंडिगोने 26 ऑक्टोबरपासून कोलकाता ते ग्वांगझू दरम्यान दररोज उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली होती. तसेच दिल्ली-ग्वांगझू मार्गावरही उड्डाणे लवकर सुरू होण्याची अपेक्षा आहे. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी सांगितले की, थेट उड्डाणे सुरू झाल्याने भारत-चीन द्विपक्षीय संबंधांचा नवा टप्पा सुरू होईल आणि प्रवाशांना सुविधा मिळेल. कोविड-19 साथीच्या काळात भारत आणि चीनमधील सर्व उड्डाणे बंद करण्यात आली होती. तसेच गलवान खोऱ्यातील संघर्षामुळे आणि एअर बबल करार न झाल्यामुळे उड्डाणे बराच काळ विस्कळीत राहिली होती. आता या नवीन निर्णयामुळे हवाई वाहतूक पुन्हा सुरळीत होणार आहे.