India Criticizes Pakistan in UN Security Council : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अधिवेशनादरम्यान भारताने अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यांचा (Air Strikes in Afghanistan) तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. भारताने 'अफगाण नागरिकांवर होणारे हल्ले हे युद्धाचं कृत्य (Act of War) आहे,' अशी ठाम भूमिका मांडत पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांत जोरदार फटकारले आहे. प्रादेशिक स्थिरता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या उल्लंघनांवर (International Law Violations) भारताने गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
11-12 ऑक्टोबरच्या संघर्षावर ताशेरे
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये मागील काही महिन्यांपासून तणावाचं वातावरण आहे. कारण या दोन शेजारी देशांमध्ये 11-12 ऑक्टोबरदरम्यान अभूतपूर्व संघर्ष उफाळून आला होता. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ले आणि सीमावर्ती भागांतील चौक्यांवर हल्ला चढवला होता. त्यानंतर अफगाणिस्ताननेही जशास तसे प्रत्युत्तर दिले आणि हा हल्ला अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर असल्याचे म्हटले होते.
निष्पाप नागरिकांवरील हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन
संयुक्त राष्ट्रांमधील (United Nations) भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वतानेनी हरीश यांनी भारताची भूमिका मांडली. त्यांनी पाकिस्तानच्या व्यापार आणि दहशतवादाबाबतच्या भूमिकेवरून गंभीर चिंता व्यक्त करत पाकिस्तानवर जोरदार टीका केली. निष्पाप महिला, मुले आणि क्रिकेटपटूंच्या मृत्यूला अत्यंत दुःखद म्हणत, भारताने पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांवरून संयुक्त राष्ट्रांत ताशेरे ओढले. हे हल्ले संयुक्त राष्ट्रांच्या आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचं भारताने स्पष्ट केले.
हेही वाचा - Donald Trump: ट्रम्प यांचा ‘Gold Card’ प्रस्ताव; परदेशी विद्यार्थ्यांसाठी आणि स्किल्ड वर्कर्ससाठी मोठी संधी
पुनर्बांधणीसाठी संघर्ष करणाऱ्या राष्ट्राविरुद्ध युद्धाचे कृत्य
पार्वतानेनी हरीश (Parvataneni Harish) म्हणाले की, "आम्ही संयुक्त राष्ट्रांच्या सनद (UN Charter) आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा पूर्ण आदर करण्याच्या आणि निष्पाप नागरिकांच्या संरक्षणाच्या मागण्यांना समर्थन देतो." त्यांनी पुढे म्हटले की, "अशा कृती जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) नियमांचे उल्लंघन आहेत आणि कठीण परिस्थितीत पुनर्बांधणीसाठी संघर्ष करणाऱ्या असुरक्षित राष्ट्राविरुद्ध उघड धमक्या आणि युद्धाच्या कृती आहेत."
अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाला भारताचा ठाम पाठिंबा
भारताने अफगाणिस्तानच्या प्रादेशिक अखंडता, सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याला आपला ठाम पाठिंबा असेल, असेही हरीश यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये पाकिस्तानला फटकारणारे पार्वतानेनी हरीश हे 1990 च्या तुकडीतील भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) अधिकारी आहेत. ते 1 सप्टेंबर 2024 पासून न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी आहेत. यापूर्वी त्यांनी 2021 ते 2024 पर्यंत जर्मनीमध्येही आणि 2016 ते 2019 पर्यंत व्हिएतनाममध्येही भारताचं प्रतिनिधीत्व केले आहे.
हेही वाचा - H1B Visa Appointments : H-1B अर्जदारांना मोठा फटका; अमेरिका करणार सोशल मीडिया तपासणी, मार्चपर्यंत नियुक्ती स्थगित