India Seychelles Relations: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सेशेल्सच्या 3 दिवसीय अधिकृत दौऱ्यावर असून, 28 जून 2026 रोजी त्यांनी सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधांवर विस्तृत चर्चा केली. या उच्चस्तरीय बैठकीत भारत आणि सेशेल्स दरम्यान संरक्षण, डिजिटल तंत्रज्ञान, आरोग्य आणि अंतराळ यांसारख्या विविध क्षेत्रांतील तब्बल 19 करारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. भारत आणि सेशेल्स हे दोघेही हिंदी महासागराकडे आपले 'सामायिक घर' म्हणून पाहतात. त्यामुळे या क्षेत्राची सुरक्षा आणि समृद्धी राखणे ही दोन्ही देशांची सामूहिक जबाबदारी आहे, असे पंतप्रधान मोदींनी या बैठकीत नमूद केले. दोन्ही देशांच्या राजनैतिक संबंधांना 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका विशेष बोधचिन्हाचे अनावरणही यावेळी करण्यात आले.
हिंदी महासागराला संधींचा महासागर बनवणार
दोन्ही देशांच्या नेत्यांनी हिंदी महासागर क्षेत्रातील वाढती आव्हाने लक्षात घेता सागरी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे जाहीर केले. समुद्री चाचेगिरी, अमली पदार्थांची तस्करी, बेकायदेशीर मासेमारी आणि सीमापार गुन्हेगारी यांसारख्या गंभीर संकटांविरोधात दोन्ही देश एकत्रितपणे लढा देणार आहेत. भागीदारी ही देशाच्या आकारावर नव्हे, तर परस्पर आदर आणि विश्वासावर आधारलेली असावी, हाच भारताचा सागरी दृष्टिकोन असल्याचे सांगत मोदींनी हिंदी महासागराला 'संधींचा महासागर' (Ocean of opportunities) बनवण्याचा संकल्प मांडला.
सेशेल्समध्येही चालणार भारताचे UPI; डिजिटल पेमेंट आणि आरोग्य क्षेत्रात मोठी भागीदारी
भारताच्या 'डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधां'चा यशस्वी पॅटर्न आता सेशेल्समध्येही पाहायला मिळणार आहे. 'नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया' (NPCI) आणि 'सेंट्रल बँक ऑफ सेशेल्स' दरम्यान झालेल्या करारामुळे आता सेशेल्समध्ये भारताची लोकप्रिय 'UPI' पेमेंट यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. याशिवाय, आरोग्य क्षेत्रात सेशेल्समधील नागरिकांना भारताच्या 'जन औषधी' योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी 'एचएलएल लाइफकेअर' आणि सेशेल्सच्या आरोग्य मंत्रालयामध्ये करार झाला आहे, ज्यामुळे तिथे स्वस्त भारतीय औषधे सहज उपलब्ध होतील.
भारताकडून संरक्षण साहित्य आणि रुग्णवाहिकांची मोठी भेट; नवीन रुग्णालयाची उभारणी होणार
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या ऐतिहासिक 19 करारांमध्ये गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणाचा करार (Extradition treaty), अंतराळाचा शांततापूर्ण वापर, एक्झिम बँकेची कर्ज सुविधा आणि एका नवीन राष्ट्रीय रुग्णालयाच्या योजनेचा समावेश आहे. भारताने सेशेल्सला संरक्षण सज्जतेसाठी 1 'फास्ट पेट्रोल वेसल' (जलद गस्ती नौका), 10 युटिलिटी वाहने आणि 5 'लेझर रेडियल क्लास' बोटी भेट देण्याची घोषणा केली. तसेच, सेशेल्स कोस्ट गार्डच्या 'पीएस झोरोस्टर' जहाजाची दुरुस्ती पूर्ण झाली असून 'डॉर्नियर' विमानाचे आधुनिकिकरण केले जाणार आहे. यासोबतच मानवी साहाय्य म्हणून भारताकडून सेशेल्सला 6 रुग्णवाहिका, 500 मेट्रिक टन तांदूळ आणि 8,500 मेट्रिक टन सिमेंट दिले जाणार आहे.
सेशेल्सच्या 'राष्ट्रीय दिन' सोहळ्याला पंतप्रधान मोदी प्रमुख पाहुणे
पंतप्रधान मोदींचा हा दौरा अशा महत्त्वपूर्ण वेळी होत आहे, जेव्हा सेशेल्स आपल्या स्वातंत्र्याचा 50 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. सेशेल्सच्या 'राष्ट्रीय दिन' (National Day) सोहळ्याला पंतप्रधान मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, जे दोन्ही देशांमधील दृढ आणि चिरस्थायी मैत्रीचे प्रतीक मानले जात आहे.