Bar Shooting News: दक्षिण आफ्रिकेतील गौतेंग प्रांतातील वेडेला टाउनशिप परिसर शनिवारी रात्री गोळीबाराच्या आवाजाने आणि नागरिकांच्या आक्रोशाने हादरून गेला. तेथील एका बारमध्ये अचानक घुसलेल्या सशस्त्र हल्लेखोरांनी केलेल्या बेछूट गोळीबारात तब्बल 17 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर इतर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, रात्री सुमारे 9:30 वाजताच्या सुमारास AK-47 रायफली आणि अत्याधुनिक पिस्तुलांनी सज्ज असलेले काही अज्ञात हल्लेखोर बारच्या आवारात आले. त्यांनी सर्वप्रथम बारबाहेर मद्यपान करत बसलेल्यांवर थेट गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर आत घुसून ग्राहकांवर अंधाधुंद गोळीबार केला. पळून जाण्यापूर्वी हल्लेखोरांनी काहींचे मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि 2 वेगवेगळ्या वाहनांतून पळ काढला.
घटनास्थळीच 13 पुरुष अन् 4 महिलांचा करुण अंत
या भयानक दुर्घटनेची माहिती मिळताच दक्षिण आफ्रिकन पोलीस सेवा (SAPS) आणि आपत्कालीन वैद्यकीय पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, गोळीबार इतका भीषण होता की, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती 13 पुरुष आणि 4 महिलांसह एकूण 17 जणांना जागीच मृत घोषित केले. या हल्ल्यात शरीरावर गंभीर दुखापती झालेल्या 15 जखमींना तातडीने जवळच्या वैद्यकीय केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून सध्या संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून संशयित हल्लेखोरांच्या शोधासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. मात्र, या भीषण नरसंहारामागचे मूळ कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा – Helicopter Crash: उड्डाण घेताच काही मिनिटांत हेलिकॉप्टर कोसळलं; भीषण दुर्घटनेत चौघांचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?
दक्षिण आफ्रिकेत सामूहिक गोळीबारांचे सत्र कायम
दक्षिण आफ्रिकेत घडलेली ही पहिलीच घटना नसून, गेल्या काही दिवसांत सामूहिक गोळीबारांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. मागील आठवड्यातच डरबन शहराच्या दक्षिणेकडील एका घरावर झालेल्या हल्ल्यात एका गर्भवती महिलेसह 11 जणांचा मृत्यू झाला होता. तर जून महिन्यात जोहान्सबर्गमधील एका वसाहतीत घडलेल्या गोळीबारात 12 जणांनी जीव गमावला होता. पोलिसांच्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशात चालू वर्षाच्या जानेवारी ते मार्च या कालावधीत दररोज सरासरी 58 जणांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. या ताज्या घटनेमुळे देशातील नागरिक सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.