थायलंडची राजधानी बँकॉक येथील एका पबमध्ये सोमवारी पहाटे भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत किमान 27 जणांचा मृत्यू झाला असून 60 हून अधिक जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी 22 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी ऑनलाइन व्हिडिओ शेअर केले आहेत; यामध्ये पबच्या दारातून आगीच्या ज्वाळा आणि धूर बाहेर पडताना दिसत असून, गोंधळाच्या वातावरणात लोक जीव वाचवण्यासाठी पळताना दिसत आहेत.
मध्यरात्रीच्या सुमारास उत्तर बँकॉकमधील ‘ना लाडप्राओ’ (Na Ladprao) पबमध्ये आग लागल्याची माहिती मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेले थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चार्नविराकुल यांनी सांगितले की, या घटनेत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.थायलंडच्या पंतप्रधानांनी सांगितले की, पबमध्ये सादरीकरण करणाऱ्या एका संगीतकाराने त्यांना सांगितले की, वीज जाण्यापूर्वी त्याने मंचाजवळील सर्किट ब्रेकरमधून धूर निघताना पाहिला होता. त्यानंतर स्फोटाचा आवाज ऐकू आला आणि संपूर्ण परिसर वेगाने दाट धुराने भरून गेला. अनेक पीडित व्यक्ती पबच्या मागील बाजूस असलेल्या प्रसाधनगृहांमध्ये आढळून आल्या.
23.57 น. รับแจ้งจากสายด่วน 199 เหตุเพลิงไหม้ภายในร้านอาหาร ใกล้เคียงซอยลาดพร้าว 1 ถนนลาดพร้าว แขวงจอมพล เขตจตุจักร เจ้าหน้าที่สถานีดับเพลิงและกู้ภัยสุทธิสาร กำลังไปที่เกิดเหตุ สถานที่เกิดเหตุ pic.twitter.com/Tw6EPb7fhS — JS100Radio (@js100radio) July 12, 2026
स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, काही मिनिटांतच आगीने संपूर्ण पबला विळखा घातला. आग लागताच काही लोकांनी जीव वाचवण्यासाठी प्रसाधनगृहांमध्ये (रेस्टरूम्समध्ये) आश्रय घेतला होता; बचाव पथकांना तिथे काही मृतदेह आढळून आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. घटनेनंतर समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये पबच्या आतील भागाचे मोठे नुकसान झाल्याचे आणि जळालेले टेबल व खुर्च्या दिसत होत्या.