Jeffrey Epstein Files Big Bang : अमेरिकेचा कुख्यात गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याच्या प्रकरणाशी संबंधित सुमारे 30,000 पानांची नवीन कागदपत्रे अमेरिकन न्याय विभागाने (DOJ) सार्वजनिक केली आहेत. या धक्कादायक फाईल्समुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून त्यांच्यावर बलात्कारासारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
विमान प्रवासाचे खोटे दावे उघड
डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी आपण कधीही एपस्टीनच्या खाजगी विमानातून प्रवास केला नसल्याचे जाहीरपणे सांगितले होते. मात्र, नवीन 'फ्लाईट लॉग्स' या दाव्याचा थेट खोटं सिद्ध करतात. जानेवारी 2020 मधील एका ईमेलनुसार, ट्रम्प यांनी 1993 ते 1996 या कालावधीत किमान 8 वेळा एपस्टीनच्या खाजगी जेटने प्रवास केल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे, यातील काही प्रवासांत ट्रम्प यांची तत्कालीन पत्नी मार्ला मॅपल्स आणि त्यांची मुलेही सोबत होती. या कागदपत्रांमध्ये प्रवासाचा उल्लेख असला तरी, त्या प्रवासादरम्यान ट्रम्प यांनी कोणताही गुन्हा केल्याचा थेट आरोप यात नाही.
रहस्यमयी महिला आणि गिस्लीन मॅक्सवेल
या विमानाच्या उड्डाणांपैकी किमान 4 प्रवासांत एपस्टीनची जवळची सहकारी गिस्लीन मॅक्सवेल देखील उपस्थित होती, जिला नंतर सेक्स ट्रॅफिकिंग प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. 1993 मधील एका फ्लाईट रेकॉर्डनुसार, विमानात केवळ एपस्टीन, ट्रम्प आणि एक 20 वर्षीय महिला होती, जिची ओळख अद्याप गुप्त ठेवण्यात आली आहे. इतर काही प्रवासांमध्ये अशाही महिलांचा समावेश होता, ज्यांना पुढे मॅक्सवेल प्रकरणात संभाव्य साक्षीदार म्हणून ओळखले गेले.
FBI फाईलमधील बलात्काराचा खळबळजनक आरोप
सर्वात वादग्रस्त खुलासा ऑक्टोबर 2020 मधील एका FBI फाईलमध्ये आढळतो. यामध्ये एका महिलेने असा दावा केला आहे की, डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री एपस्टीन या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला होता. याशिवाय, एका लिमोझिन ड्रायव्हरच्या विधानाचाही उल्लेख आहे, ज्याने 1995 मध्ये ट्रम्प यांना फोनवर एका मुलीसोबत गैरवर्तन करण्याबाबत बोलताना ऐकले होते. मात्र, न्याय विभागाने स्पष्ट केले आहे की, हे आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत किंवा त्यासाठी ठोस पुरावे मिळालेले नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे, आरोप करणाऱ्या या महिलेचा नंतर संशयास्पद परिस्थितीत गोळी लागून मृत्यू झाला होता.
हस्ताक्षरातील पत्र आणि DOJ ची भूमिका
या कागदपत्रांमध्ये एपस्टीनने हाताने लिहिलेले एक कथित पत्रही सापडले आहे, ज्यामध्ये राष्ट्राध्यक्षांविषयी आक्षेपार्ह मजकूर आहे. मात्र, अमेरिकन न्याय विभागाने (DOI) या पत्राच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 2020 च्या निवडणुकीपूर्वी अनेक कागदपत्रे कोणत्याही सखोल चौकशीशिवाय जमा करण्यात आली होती, असेही विभागाने नमूद केले आहे. ट्रम्प यांच्यावर या प्रकरणात सध्या कोणताही फौजदारी खटला भरलेला नसला तरी, या नवीन खुलाशांमुळे अमेरिकन राजकारणात मोठा भूकंप आला आहे.