Nepal Flood : नेपाळमधील नुवाकोट जिल्ह्यातील त्रिशुली खोऱ्यात बुधवारी सकाळी निसर्गाने अत्यंत रौद्ररूप धारण केले. अचानक आलेल्या भीषण पुरामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला असून अनेक इमारती पत्त्यांसारख्या कोसळल्या. मात्र, या भीषण आपत्तीत त्रिभुवन माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र दवाडी हे विद्यार्थ्यांसाठी देवदूत ठरले. सकाळी शाळा भरत असतानाच त्यांच्या एका मित्राने फोनवरून बेत्रावती भागात गाव बुडत असल्याची आणि पाण्याचा प्रचंड प्रवाह शाळेच्या दिशेने येत असल्याची पूर्वकल्पना दिली. पुराचे पाणी पोहोचण्यासाठी अवघे 10 ते 15 मिनिटे शिल्लक असल्याचे लक्षात येताच, दवाडी यांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित केली.
आपत्कालीन घंटा अन् 15 मिनिटांत शाळा रिकामी
मुख्याध्यापकांनी तातडीने धोक्याचा इशारा देणारी आपत्कालीन घंटा वाजवून सर्व वर्गखोल्या रिकाम्या करण्याचे आदेश दिले. शाळेच्या आवारात आणि वसतिगृहात असलेल्या सुमारे 900 विद्यार्थ्यांना तात्काळ पाठीमागील उंच टेकडीवर जाण्यास सांगण्यात आले, तर बसने येत असलेल्या 700 हून अधिक विद्यार्थ्यांना वाटेतूनच मागे फिरण्याचे निर्देश देण्यात आले. अवघ्या 10 मिनिटांच्या नियोजनात शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने तब्बल 1,643 विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आले. मुलांची सुरक्षितता निश्चित करत असतानाच पाण्याचा प्रचंड वेग वाढून शाळेची इमारत आणि जोडणारा पूल डोळ्यांदेखत वाहून गेला.
तीन दिवस टेकडीवर अन्नाविना घालवले; सैन्याच्या हेलिकॉप्टरने केले रेस्क्यू
शाळेची इमारत उद्ध्वस्त झाल्यानंतर मुख्याध्यापक दवाडी, काही शिक्षक आणि 40 ते 50 विद्यार्थी पुराच्या वेढ्यामुळे तीन दिवस टेकडीवर अन्ना पाण्याविना अडकून पडले होते. अखेर बचाव दलाच्या आणि सैन्याच्या हेलिकॉप्टरच्या साहाय्याने या सर्वांचा शोध घेऊन त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या भीषण दुर्घटनेत दुर्दैवाने नाश्ता बनवण्यासाठी गेलेले इतिहासाचे शिक्षक संतोष, जनरेटर रूम बंद करण्यासाठी गेलेले कर्मचारी सुलतान आणि दोन विद्यार्थ्यांचा पुराच्या प्रवाहात वाहून गेल्याने मृत्यू झाला.
शाळेच्या पुनर्बांधणीसाठी भारत सरकारकडे मदतीची याचना
या महाप्रलयात शाळेचे अतोनात नुकसान झाले असून शिक्षण व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. मुलांचे भवितव्य अंधारात सापडू नये यासाठी मुख्याध्यापक राजेंद्र दवाडी यांनी भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीचा हात मागितला आहे. नव्या आणि सुरक्षित ठिकाणी शाळेची पुनर्बांधणी करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी भारताने सहकार्य करावे, असे भावूक आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्या एका धाडसी आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे शेकडो चिमुरड्यांचे प्राण वाचल्याने सर्वत्र त्यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे.