Friday, March 13, 2026 07:11:27 AM

Iran Israel War: तेहरान हादरले; इस्रायलने हल्ला करून खामेनेईंपाठोपाठ 'या' मोठ्या नेत्यालाही संपवलं, मध्यपूर्वेत महायुद्धाचा भडका सुरूच

इराणने प्रतिहल्ल्याची भूमिका घेतल्याने संघर्ष प्रादेशिक युद्धात रूपांतरित होण्याची भीती व्यक्त होत आहे.

iran israel war तेहरान हादरले इस्रायलने हल्ला करून खामेनेईंपाठोपाठ या मोठ्या नेत्यालाही संपवलं मध्यपूर्वेत महायुद्धाचा भडका सुरूच

इराण: मध्यपूर्वेतील वाळवंट सध्या केवळ उन्हाच्या झळांनी नव्हे, तर क्षेपणास्त्रांच्या आगीने होरपळत आहे. 'जशास तसे' या सूडचक्राने आता एका भीषण महायुद्धाचे रूप धारण केले आहे. इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता केवळ सीमेवरील चकमकींपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर या वणव्यात आता अमेरिकेनेही अधिकृतपणे उडी घेतली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूचा धक्का ताजा असतानाच, आता इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त कारवाईत इराणच्या आणखी एका बड्या नेत्याला लक्ष करण्यात आले आहे. इराणचे माजी राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांचा इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याची अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि इस्रायलने 'ऑपरेशन एपिक फ्युरी' अंतर्गत इराणच्या नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे. इराणची राजधानी तेहरानच्या उत्तर-पूर्व भागात असलेल्या एका सुरक्षित इमारतीत महमूद अहमदीनेजाद यांनी आपल्या टीमसह आश्रय घेतला होता. याच परिसरात त्यांचे अधिकृत निवासस्थानही आहे. शनिवारी याच इमारतीवर अचूक क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला.

या भयंकर हल्ल्यात अहमदीनेजाद यांच्यासह त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले 'इस्लामिक रिव्हॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्स'चे सशस्त्र जवान आणि इतर काही जवळच्या व्यक्तींचाही जागीच मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये त्यांच्या निवासस्थानाचा आणि परिसराचा अक्षरशः सांगाडा झाल्याचे पाहायला मिळत आहे. या विध्वंसामध्ये दोन निष्पाप शाळकरी मुलांचाही बळी गेल्याचा दावा केला जात असून, यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Nano Banana 2 : गुगलने Faster AI इमेजिंगसाठी लाँच केला नॅनो बनाना 2; पाहा त्याची प्रमुख वैशिष्ट्ये आणि वापर

एकापाठोपाठ एक मिळणाऱ्या या धक्क्यांमुळे इराण सध्या कमालीचा आक्रमक झाला आहे. काहीच तासांपूर्वी इस्रायल आणि अमेरिकेच्या थेट कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा खात्मा करण्यात आला होता. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये राष्ट्रीय दुखवटा पाळला जात असून, देशभरात संतापाचा ज्वालामुखी खदखदत आहे. इराणने आता आक्रमक पवित्रा आणखी टोकदार केला आहे. सलग दोन मोठ्या नेत्यांना गमावल्यामुळे इराणच्या अस्तित्वालाच आणि सार्वभौमत्वाला नख लावण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

या सर्व घडामोडींनंतर इराणचे विद्यमान राष्ट्रपती मसूद पेजेशकियान यांनी अमेरिका आणि इस्रायलला सज्जड दम भरला आहे. "आम्ही जशास तसे उत्तर देत राहू. आमच्या नेत्यांच्या सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेतला जाईल आणि अमेरिका-इस्रायलचे लष्करी तळ उद्ध्वस्त केले जातील," असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.

केवळ शब्दांपुरते मर्यादित न राहता इराणने प्रत्यक्ष कारवाईला सुरुवातही केली आहे. कुवेत, कतार, इराक आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये असलेल्या अमेरिकन लष्करी तळांवर इराणने जोरदार क्षेपणास्त्र हल्ले चढवले आहेत. याव्यतिरिक्त संयुक्त अरब अमिरातीलाही (UAE) इराणच्या या प्रकोपाचा फटका बसला आहे.

दोन अतिबलाढ्य नेत्यांच्या मृत्यूने इराणच्या राजकीय आणि लष्करी वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असली, तरी सूडाची आग मात्र अधिक भडकली आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की, नेतृत्वहीन झालेला इराण भविष्यात कोणती पावले उचलणार? मध्यपूर्वेत उडालेला हा भडका केवळ दोन-तीन देशांपुरता मर्यादित राहील की संपूर्ण जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटेल? याकडे संपूर्ण जगाचे श्वास रोखून लक्ष लागले आहे. एक गोष्ट मात्र निश्चित आहे की, या युद्धातून कोणीही माघार घेण्यास तयार नसून, आगामी काळ जागतिक शांततेसाठी अत्यंत अग्निपरीक्षेचा ठरणार आहे.

हेही वाचा: Today's Horoscope 2026: आजच्या चंद्रग्रहणाचा प्रभाव, दुसरीकडे होळीच्या शुभ मुहूर्तावर 'या' राशींचे नशीब बदलणार; वाचा संपूर्ण राशिभविष्य


सम्बन्धित सामग्री