Sunday, April 20, 2025 05:25:12 AM

आई की राक्षस? 9 वर्षांच्या मुलाला 2 वर्ष घरात एकट्याला ठेवलं अन् प्रियकराकडे राहायला गेली..!

चिमुरड्या मुलाला घरात एकट्याला सोडून त्याची आई प्रियकरासोबत राहण्यासाठी निघून गेली. 2 वर्षांनी हा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर महिलेला अटक झाली असून तिला 18 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.

आई की राक्षस 9 वर्षांच्या मुलाला 2 वर्ष घरात एकट्याला ठेवलं अन् प्रियकराकडे राहायला गेली

पॅरिस : आई तिच्या मुलांसाठी सर्वस्व असते. दुर्दैवाने एखाद्या मुलाची आई हयात नसेल, तर त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. 'स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी' असं गाणं आपण ऐकलं आहे. मात्र, ही अशा एका मुलाची कहाणी आहे, ज्याला आई असूनही त्याच्यावर केविलवाण्या स्थितीत जगण्याची वेळ आली. या मुलाची आई त्याला घरात एकट्याला राहायला सोडून तिच्या प्रियकरासोबत निघून गेली. हा मुलगा तब्बल दोन वर्षे त्याच्या घरी एकटाच राहिला.

माणसाचं आयुष्य जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबत आपलेपणाच्या वातावरणाचीही गरज असते. लहान मुलांना आई-वडिलांच्या प्रेमाची, मायेची आणि त्यांचं पुढील आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी संस्कारांचीही गरज असते. पण सध्या जगात काही ठिकाणी अशी परिस्थिती झाली आहे की, आई-वडिलांवरच योग्य संस्कार झालेले नसतील, त्यांनाच वळण नसेल, तर ते मुलांना या गोष्टी कुठून देतील..

तर, या एकट्या राहिलेल्या चिमुरड्याची आई त्याच्या घरापासून केवळ पाच किलोमीटर अंतरावर राहत होती. ती त्याला अधूनमधून भेटण्यासाठी येत असे आणि त्याला काही खाण्याचे पदार्थ देऊन परत जात असे. पण ती त्याला कधीही आपल्यासोबत राहायला घेऊन जात नसे. केक, डबाबंद पदार्थ आणि पॅकेज्ड फूड खाऊन हा मुलगा दोन वर्ष जगला. ही बाब शासकीय व्यवस्थेच्या लक्षात आल्यानंतर त्याच्या घराचा दरवाजा उघडून त्याला ताब्यात घेण्यात आलं. त्या वेळेस तो राहात असलेल्या फ्लॅटमध्ये काही चोरलेले टोमॅटोही सापडले. हा मुलगा 2020 ते 2022 पर्यंत मिठाई, कॅन फूड आणि शेजाऱ्यांच्या थोड्याशा मदतीमुळे जगला.

हेही वाचा - रोबो आणि AI टेक्नॉलॉजीच्या मदतीने प्रेग्नन्सी; IVF यशस्वी होऊन पहिल्या बाळाचा जन्म

अनेक महिने शेजाऱ्यांनाही मुलगा फ्लॅटमध्ये एकटा असल्याची माहिती नव्हती. तो शाळेतही एकटाच जायचा. पण जेव्हा शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना बोलावलं तेव्हा सत्य उघड झालं. शेजाऱ्यांच्या तक्रारीवरून जेव्हा पोलीस फ्लॅटमध्ये दाखल झाले, तेव्हा तेही थक्क झाले.  यानंतर, पोलिसांनी मुलाची 39 वर्षीय आई अलेक्झांड्रा हिचा शोध सुरू केला. ती सायरेउइल शहरातील तिच्या प्रियकराच्या घरी सापडली. जेव्हा परिसरातील लोकांची चौकशी केली तेव्हा असं दिसून आलं की तिने आपल्या मुलाबद्दलचं सत्य शेजाऱ्यांपासूनही लपवलं होतं.

दोन वर्षांपासून फ्रान्समधील चॅरेन्टे प्रदेशातील नेरसॅक शहरातील अपार्टमेंटमध्ये हा मुलगा एकटाच राहत होता. तो शाळेतही जात होता. त्याचा शाळेतील अभ्यासही चांगला होता. या भागात अनेकदा थंडीच्या दिवसांत गरम पाणी आणि रूम हीटरची गरज भासते. मात्र, हा मुलगा राहत असलेल्या घरात याची काहीच व्यवस्था नव्हती. तो बिचारा इतके दिवस थंडी वाजू लागली की, बरीचशी ब्लँकेट गुंडाळून बसत असे.

ज्या शाळेत तो मुलगा जातो, तिथल्या एका शिक्षकाने सांगितलं, "तो खूप समजूतदार, ताकदवान आणि स्वावलंबी आहे, कदाचित गरजेपेक्षा जास्त. उष्णतेशिवाय थंडी सहन करणं, अनेक रजाईत गुंडाळून झोपणं, थंड पाण्यात आंघोळ करणं किंवा अंधारात राहणं या सर्वांमुळे तो इतक्या लहान वयातच अत्यंत समजूतदार बनला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतक्या अडचणी असूनही, तो दररोज शाळेत जायचा आणि इतका चांगला अभ्यास करायचा की, त्याच्या शिक्षकांनाही काहीच कळले नव्हते.

चौकशीदरम्यान महिलेने मुलगा आपल्यासोबत राहत होता, असं सांगितलं. तसेच, तो खोटं का बोलत आहे, हे मला माहीत नाही, असा कांगावाही तिनं केला. पण पोलिसांनी तपास केला तेव्हा ती खोटं बोलत असल्याचं समोर आलं. त्या महिलेने पुढे सांगितले की, ती दररोज तिच्या मुलाला शाळेत सोडत असे. पण महिलेच्या फोनच्या लोकेशन डेटावरून ते खोटे असल्याचे सिद्ध झाले. असे असूनही, ती महिला आपल्या मुलाला सोडून तिच्या प्रियकरासोबत राहत आहे, हे स्वीकारू इच्छित नव्हती. दुसरीकडे, शेजाऱ्यांनी सांगितले की, ती नेहमीच फ्लॅटमधून एकटीच बाहेर पडायची.

हेही वाचा - अमेरिकन विमानतळावर भारतीय महिलेला 8 तास ताब्यात ठेवलं; उबदार कपडे काढायला लावून पुरुष अधिकाऱ्यांकडून तपासणी

पोलिसांनी महिलेला अटक करून न्यायालयातही हजर केले. पण ती महिला न्यायालयातही आपली चूक मान्य करायला तयार नव्हती. न्यायालयात सुनावणीदरम्यान, न्यायाधीशांनी विचारले की तिचा मुलगा असं का म्हणतो की, तिने त्याला दोन वर्षे एकटं सोडलं होतं? या प्रश्नाचं उत्तर देताना महिला म्हणाली, "तो असं का म्हणतो हे मला माहीत नाही."

न्यायालयाने या महिलेला स्वतःच्या मुलाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल 18 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मात्र, तिला काही अटी पूर्ण करताना तिला पोलिसांच्या देखरेखीखाली राहायलाही सांगण्यात येऊ शकते. यासाठी महिलेला फक्त 6 महिने इलेक्ट्रॉनिक अँकल ब्रेसलेट घालावं लागेल. दुसरीकडे मुलाला गेल्या वर्षी फोस्टर केयरमध्ये ठेवण्यात आलं. तेव्हापासून त्याची आई त्याला फक्त दोनदा भेटायला आली. अशा परिस्थितीत मुलाने त्याच्या आईशी असलेले सर्व संबंध तोडले आहेत.
 


सम्बन्धित सामग्री