मुंबई: Netflix वापरणाऱ्या युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता नेटफ्लिक्सवर कंटेंट पाहणे निवडक बाजारपेठांतील ग्राहकांसाठी अधिक खर्चिक होणार आहे. नेटफ्लिक्सने अमेरिका, अर्जेंटिना, कॅनडा आणि पोर्तुगालसारख्या देशांमध्ये आपल्या स्टँडर्ड आणि प्रीमियम प्लॅन्सचे दर वाढवले आहेत.
नेटफ्लिक्सने स्पष्ट केले आहे की, दर्जेदार कंटेंटसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे, ज्यामुळे या दरवाढीची गरज निर्माण झाली आहे. प्रीमियम मेंबरशिपची किंमत आता अमेरिकेत $25 (सुमारे ₹2163) इतकी झाली आहे, तर स्टँडर्ड प्लॅनसाठी $18 (सुमारे ₹1557) मोजावे लागतील.दरवाढीमुळे जाहिरातींसह कंटेंट पाहणाऱ्या युजर्सना मात्र दिलासा मिळाला आहे. जाहिरात प्लॅन्सची किंमत कमी ठेवली गेली आहे, आणि सुमारे 70 दशलक्ष युजर्स दरमहा जाहिरातींसह कंटेंट पाहतात. जाहिरातसमर्थित प्लॅन्समध्ये ग्राहक वाढल्याने कंपनीचा महसूलही वाढला आहे.
युजर्ससाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे या दरवाढीचा भारतातील नेटफ्लिक्स वापरकर्त्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. भारतासाठी सध्या नेटफ्लिक्सच्या प्लॅन्समध्ये कोणताही बदल जाहीर केलेला नाही.जर तुम्ही भारतात नेटफ्लिक्स वापरत असाल, तर तुम्हाला या दरवाढीची चिंता करण्याची गरज नाही. मात्र, जागतिक बाजारपेठेत या किंमतींचा परिणाम ग्राहकांच्या निवडींवर होऊ शकतो.Netflix ने 2024 च्या अखेरीस 19 दशलक्ष नवीन ग्राहक जोडले असून एकूण ग्राहकांची संख्या आता 30 कोटींहून अधिक झाली आहे.