Australian PM Wedding : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी वयाच्या 62 व्या वर्षी त्यांची जीवनसाथी जोडी हेडन यांच्याशी करून एक नवा विक्रम (Australian PM Albanese New Record) प्रस्थापित केला आहे. पंतप्रधानपदावर असताना लग्न करणारे ते ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. 62 वर्षांचे अल्बनीज आणि 46 वर्षांच्या जोडी हेडन यांनी कॅनबेरा येथील पंतप्रधान निवासस्थान ‘द लॉज’ च्या बागेत एका खासगी समारंभात लग्न केले. गेल्या अनेक वर्षांपासून अल्बनीज यांच्यासोबत असलेल्या जोडी हेडन आता अधिकृतपणे ऑस्ट्रेलियाच्या फर्स्ट लेडी (Australian First Lady) बनल्या आहेत.
‘लग्न झालं’ म्हणत सोशल मीडियावर घोषणा
हा विवाह समारंभ व्हॅलेंटाईन डे 2024 रोजी केलेल्या त्यांच्या प्रस्तावानंतर जवळजवळ एक वर्षाने पार पडला. त्यावेळी अल्बनीज यांनी असे जाहीर केले होते की, त्यांना अशी जोडीदार मिळाली आहे ‘जिच्यासोबत मला माझे संपूर्ण आयुष्य घालवायचे आहे.’ लग्नाची घोषणा करताना पंतप्रधान अल्बनीज यांनी सोशल मीडियावर फक्त एका शब्दात भावना व्यक्त केल्या: ‘लग्न झालं’. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, ते बो-टाई घालून हसणाऱ्या नववधू जोडी यांचा हात धरून चालताना दिसले. पांढऱ्या लांब गाऊनमध्ये असलेल्या जोडी हेडन यांच्यावर फुलांच्या पाकळ्या उधळल्या जात होत्या.
हेही वाचा – WTF Podcast: निखिल कामथच्या ‘WTF’ पॉडकास्टमध्ये एलोन मस्क! टीझर व्हायरल; चाहते म्हणाले, ‘हे खरे की AI?’
स्वतः लिहिलेली शपथ आणि रोमँटिक डान्स
या खासगी समारंभात त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य आणि अगदी जवळच्या मित्रांना आमंत्रित केले होते. एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, या जोडप्याने आपल्या लग्नाची शपथ (Vows) स्वतः लिहिली आणि एका समारंभ अधिकाऱ्याने लग्नाच्या विधी पूर्ण केल्या. लग्न समारंभ पूर्ण झाल्यानंतर, हे जोडपे स्टीवी वंडर (Stevie Wonder) यांच्या ‘साईन्ड, सील्ड, डिलिव्हर्ड (आय एम युअर्स)’ (Signed, Sealed, Delivered (I’m Yours)) या प्रसिद्ध गाण्यावर हसतमुखाने समारंभ स्थळाहून बाहेर पडले. त्यांचा पहिला डान्स फ्रँक सिनात्रा यांच्या (Frank Sinatra) ‘द वे यू लुक टूनाईट’ (The Way You Look Tonight) या रोमँटिक गाण्यावर झाला.
Married?❤️? pic.twitter.com/mSzojtBF2I — Anthony Albanese (@AlboMP) November 29, 2025
पाच वर्षांपूर्वी झालेली भेट
अँथनी अल्बनीज आणि जोडी हेडन यांची भेट सुमारे पाच वर्षांपूर्वी मेलबर्नमध्ये एका व्यवसायिक डिनर दरम्यान झाली होती. 2019 मध्ये आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिलेल्या अल्बनीज यांना नाथन नावाचा एक मुलगा आहे. जोडी हेडन या गेल्या अनेक वर्षांपासून अल्बनीज यांच्यासोबत सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसत आहेत. 2022 च्या निवडणूक अभियानातही त्या त्यांच्यासोबत होत्या आणि मे महिन्यातील लेबर पार्टीच्या मोठ्या विजयाच्या वेळीही त्यांनी अल्बनीज यांना साथ दिली होती.
हनिमूनचा सर्व खर्च स्वतः उचलणार
हा विवाह समारंभ पूर्ण झाल्यानंतर, हे जोडपे पुढील आठवड्यात सोमवार ते शुक्रवारपर्यंत ऑस्ट्रेलियातच हनिमून (Honeymoon) साजरा करेल. त्यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, या हनिमूनचा सर्व खर्च अल्बनीज आणि जोडी हेडन हे स्वतः उचलणार आहेत.