Thursday, November 13, 2025 02:21:00 PM

Pakistan Islamabad Airport: कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला पाकिस्तान; इस्लामाबाद विमानतळ यूएईला विकणार

आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानने इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ यूएईच्या ताब्यात दिले आहे. IMF कर्जफेडीसाठी मालमत्ता विक्रीचा मार्ग स्वीकारल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली.

pakistan islamabad airport कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला पाकिस्तान इस्लामाबाद विमानतळ यूएईला विकणार

गरीबी, दहशतवाद आणि राजकीय अस्थिरतेच्या दलदलीत बुडालेलं पाकिस्तान आता जगासमोर आर्थिक विनोदाचा विषय बनलं आहे. कधी अण्वस्त्रांची ताकद दाखवणारा आणि भारताशी स्पर्धा करणारा पाकिस्तान आज आपल्या अस्तित्वासाठी झगडतोय. देशात ना उद्योग उरलेत, ना विश्वासार्ह शासन. आता स्थिती अशी आली आहे की पाकिस्तानला स्वतःचं आंतरराष्ट्रीय विमानतळ विकावं लागलं आहे!

होय, हीच पाकिस्तानची वास्तविकता आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या या देशाने इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाचं व्यवस्थापन संयुक्त अरब अमिरातीला (UAE) सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. कधी जगाला "इस्लामिक पॉवर" म्हणून दाखवणारा पाकिस्तान आता आपली मालमत्ता तारण ठेवून काही पैशांसाठी परदेशी गुंतवणूकदारांच्या दारात हात पसरतोय.

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान सरकार इस्लामाबाद विमानतळ दुसऱ्या देशाला चालवायला देण्याच्या प्रयत्नात होती. सुरुवातीला ब्रिटन आणि तुर्कीच्या कंपन्यांनी एकत्र येऊन ऑफर दिली होती, पण त्यांनी फक्त 40 टक्के महसुलाचा वाटा देण्याची तयारी दाखवली होती. ही ऑफर पाकिस्तानने नाकारली आणि अखेर यूएईकडून 60 टक्के महसुलाच्या ऑफरवर सौदा पक्का केला. या करारानुसार इस्लामाबाद विमानतळाच्या संचालनातून मिळणारा नफा आता दोन भागांत विभागला जाणार आहे. महसुलातील 60 टक्के हिस्सा पाकिस्तानकडे राहील, तर उर्वरित रक्कम यूएईकडे जाईल. पाकिस्तानच्या नागरी विमान वाहतूक विभागाचे संयुक्त सचिव वसीम तारिक यांनी या कराराची पुष्टी केली असून, औपचारिक स्वाक्षऱ्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं आहे.

हेही वाचा: Sikandar Shaikh: महाराष्ट्र केसरी किताब पटकवणाऱ्या सिकंदर शेखला अटक, राजस्थानातील कुख्यात टोळीशी संबंध

मात्र एवढ्यावर पाकिस्तान थांबलेला नाही. सरकार आता लाहोर आणि कराची विमानतळांचं व्यवस्थापनदेखील परदेशी कंपन्यांकडे देण्याच्या तयारीत आहे. या दोन्ही विमानतळांसाठी आर्थिक सल्लागार नेमण्यात आले असून, पुढील काही महिन्यांत हे करारही निश्चित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर एवढा वाढला आहे की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) हा त्यांचा ‘वाचवणारा’ बनला आहे. IMF ने पाकिस्तानला पैशांचा अपव्यय थांबवण्याचा आणि अर्थव्यवस्था सुधारण्याचा सल्ला दिला असून, डिसेंबरपर्यंत 1.2 अब्ज डॉलरचे कर्ज देण्याची शक्यता व्यक्त केली आहे. म्हणजेच, विमानतळ विक्रीचा पैसा IMFच्या कर्जफेडीतच गेला तर आश्चर्य वाटायला नको.

याशिवाय, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (PIA) विक्री करण्याची तयारीही सुरू आहे. खाजगीकरण आयोगाचे सचिव उस्मान बाजवा यांनी सांगितले की, डिसेंबरपर्यंत PIA विक्री पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. या विक्रीमुळे काही प्रमाणात परकीय चलन मिळेल, मात्र दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य अजूनही दूरच आहे. तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची अवस्था अशी झाली आहे की आता देशाने केवळ संपत्ती विकून स्वतःचा निभाव लावणं थांबवावं. सुधारणा, पारदर्शक शासन आणि भ्रष्टाचारावरील नियंत्रणाशिवाय पाकिस्तानला पुन्हा उभं राहणं अवघड आहे. अन्यथा, “एकेकाळी अण्वस्त्रांचा अभिमान असलेला देश” लवकरच “स्वतःची मालमत्ता विकणारा देश” म्हणून ओळखला जाईल.

हेही वाचा: Aadhaar Card New Rules: आजपासून आधारकार्डमधील हे नियम बदलणार, नेमकं काय होणार?


सम्बन्धित सामग्री