Pakistan-Afghanistan Conflict: अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागाला लक्ष्य करत पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात मोठे मनुष्यबळ नुकसान झाले आहे. या भीषण हल्ल्यामध्ये 11 निष्पाप बालकांसह एकूण 13 जणांना आपला जीव गमावावा लागला असून, अन्य 14 नागरिक गंभीररित्या जखमी झाले आहेत. कुनार, खोस्त आणि पक्तिका या अफगाण प्रांतांमधील निवासी क्षेत्रांवर हा हल्ला करण्यात आला. पाकिस्तानने हवाई हद्दीचे उल्लंघन करून वृद्ध, महिला आणि मुलांना लक्ष्य केल्याचा गंभीर आरोप अफगाणिस्तानने केला आहे. आंतरराष्ट्रीय नियमांची पायमल्ली करणाऱ्या या कृत्याचा अफगाण प्रशासनाने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.
अफगाण प्रवक्त्यांची संतप्त प्रतिक्रिया
मंगळवारी रात्री उशिरा पाकिस्तानी लष्कराकडून झालेल्या या कारवाईवर अफगाणिस्तानचे अधिकृत प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. पाकिस्तानी लढाऊ विमानांनी निवासी वस्त्यांवर बेछूट बॉम्बफेक केल्यामुळे नागरिकांची अनेक घरे पत्त्यासारखी कोसळली आणि यात निष्पाप लोकांचा बळी गेला, अशी माहिती मुजाहिद यांनी दिली.
सीमावर्ती भागात तणाव कायम; पाकिस्तानकडून अद्याप मौन
गेल्या काही काळापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमाभागात संघर्ष धुमसत असून, आतापर्यंत यामध्ये शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ताज्या हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती अफगाण सरकारने केली असली, तरी पाकिस्तानच्या परराष्ट्र किंवा संरक्षण मंत्रालयाकडून या लष्करी कारवाईबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
खैबर पख्तुनख्वामधील दहशतवादी हल्ल्याची पार्श्वभूमी
पाकिस्तानच्या या आक्रमक पवित्र्यामागे एक दिवसापूर्वी झालेला दहशतवादी हल्ला कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील 'हसन खेल' चौकीवर संशयित पाकिस्तानी तालिबानी बंडखोरांनी हल्ला चढवला होता. पाकिस्तान गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार, या चकमकीत 'फ्रंटियर कॉन्स्टेब्युलरी'चे 6 जवान शहीद झाले होते. त्यानंतर सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर देत 8 हल्लेखोरांना कंठस्नान घातले आणि चौकीवरील ताबा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न अपयशी ठरवला. या शहीद जवानांच्या पेशावरमधील अंत्यसंस्काराला पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी स्वतः उपस्थिती लावली होती.