Imran Khan Eye Sight : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि 'पीटीआय' (PTI) पक्षाचे संस्थापक इमरान खान यांच्या आरोग्याबाबत सध्या पाकिस्तानात खळबळजनक चर्चा सुरू आहे. सोमवारी रात्री उशिरा, म्हणजे सुमारे 2:00 वाजता, त्यांना रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगातून कडक सुरक्षेत इस्लामाबादमधील 'पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' (PIMS) रुग्णालयात हलवण्यात आले. या गुपचुप हालचालीमुळे आणि त्यांच्या डोळ्यांच्या ढासळत्या प्रकृतीमुळे पाकिस्तानात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. इमरान खान यांची ढासळती प्रकृती शाहबाज शरीफ सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
डोळ्यांच्या गंभीर आजाराने ग्रासले
इमरान खान यांना 'Central Retinal Vein Occlusion' (CRVO) हा डोळ्यांचा गंभीर आजार झाला आहे. त्यांच्या उजव्या डोळ्याची दृष्टी सुमारे 85 टक्के गेली असून आता केवळ 15 टक्के दृष्टी शिल्लक असल्याचे त्यांच्या वकिलांनी आणि मुलाने (कासिम खान) सांगितले आहे. या आजारात रेटिनातील रक्तवाहिनीत अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे दृष्टी कायमची जाण्याचा धोका असतो. याच उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते, जिथे त्यांना 'Anti-VEGF' नावाचे दुसरे इंजेक्शन देण्यात आले. यापूर्वी 24 जानेवारी 2026 रोजी त्यांना पहिले इंजेक्शन देण्यात आले होते. गेल्या 900 दिवसांहून अधिक काळ तुरुंगात असलेल्या इमरान खान यांच्या प्रकृतीचा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चेत आला आहे.
हेही वाचा - Donald Trump: ‘मी आठ युद्धे थांबवली; पंतप्रधान मला म्हणाले की तुम्ही दखल घेतली नसती तर…’; भारत-पाकिस्तान युद्धावर ट्रम्प पुन्हा बरळले
रात्रीच्या अंधारात उपचारासाठी नेले आणि पीटीआयचा आक्षेप
इमरान खान यांना रुग्णालयात नेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्यांच्या पक्षाने (PTI) शाहबाज शरीफ सरकारवर जोरदार टीका केली आहे. "एखाद्या कैद्याला उपचारासाठी नेताना त्याच्या नातेवाईकांना किंवा वकिलांना का कळवले जात नाही?" असा सवाल बॅरिस्टर गोहर खान यांनी उपस्थित केला आहे. पीटीआयने या प्रक्रियेत 'पारदर्शकता' हवी असल्याचे म्हटले असून, इमरान खान यांना सरकारी रुग्णालयाऐवजी 'शिफा इंटरनॅशनल' या खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी केली आहे. या गुप्ततेमुळे त्यांच्या सुरक्षेबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत. पाकिस्तानात त्यांच्या समर्थकांनी संसदेबाहेर आंदोलने सुरू केली असून, त्यांना तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्याची मागणी केली जात आहे.
बहिणीने उपस्थित केले गंभीर प्रश्न
इमरान खान यांच्यावर सध्या 15 गाड्यांच्या ताफ्यात आणि जॅमर्सच्या कडक सुरक्षेत उपचार केले जात आहेत. त्यांना या उपचारांमधील तिसरे आणि महत्त्वाचे इंजेक्शनही दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. इमरान खान यांची बहीण अलीमा खान यांनी सरकारवर थेट अविश्वास व्यक्त केला आहे. "आम्हाला सरकारी रुग्णालयांच्या रिपोर्ट्सवर विश्वास नाही. आम्हाला बातम्यांमधून समजले की त्यांना रात्रीच्या वेळी इंजेक्शन देण्यासाठी नेले होते," असे त्यांनी म्हटले आहे. सुनील गावस्कर, कपिल देव आणि सौरव गांगुली यांसारख्या दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंनीही त्यांच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त करत त्यांना योग्य उपचार मिळावेत, अशी विनंती केली आहे.
हेही वाचा - Indian Restaurant in London: 16 वर्षांपासून भारतीय खाद्यसंस्कृतीची ओळख बनलेले ‘Rangrez’ रेस्टॉरंट होणार कायमचे बंद; 'हे' धक्कादायक कारण आले समोर