Sunday, June 15, 2025 12:59:48 PM

भारताच्या या मित्राने दिली शत्रूला साथ! पाकिस्तानची अर्थव्यवस्था 50 वर्षांसाठी मजबूत होणार?

भारताचा मित्र असलेल्या एका मोठ्या मुस्लीम देशाने पाकिस्तानातील सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुढची 50 वर्ष पाकिस्तानची अर्थव्यवस्था मजबूत राहू शकते.

भारताच्या या मित्राने दिली शत्रूला साथ पाकिस्तानची अर्थव्यवस्था 50 वर्षांसाठी मजबूत होणार

Pakistan Gold Mine : पाकिस्तान सद्यस्थितीत कंगाल दिसत असला, तरी पाकिस्तानला तिथल्या भूमीने आणि निसर्गाने भरपूर दिलेलं आहे. मात्र, आजपर्यंत पाकिस्तानने या साधनसंपत्तीचा योग्य वापर कधीच केलेला नाही. तसेच, पाकिस्तानचा जन्म झाल्यापासून तिथल्या कोणत्याच सरकारने तिथल्या नागरिकांना चांगले जीवन मिळेल अशी फारशी कोणतीही पावले उचललेली नाहीत.

सध्या पाकिस्तानचाच भाग असलेली बलुचिस्तानमधली रेको डिक खाण ही जगातील सर्वात मोठ्या अविकसित खाणींपैकी एक आहे. येथून 50 वर्षे दरवर्षी 2 लाख टन तांबे आणि 2.5 लाख औंस सोने काढता येईल, अशी परिस्थिती आहे. मात्र, पाकिस्तान हा देश निर्माण झाल्यापासूनच बलुचिस्तान प्रांताने म्हणजेच, येथील लोकांनी स्वतःला कधीच पाकिस्तानचा भाग मानले नाही. बलुची लोकांचा पाकिस्तान सरकारच्या त्यांच्या प्रदेशातील साधनसंपत्तीचा वापर करण्यास नेहमीच विरोध राहिला आहे.

हेही वाचा - बलुच नेत्यांची पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची घोषणा; सोशल मीडियावर 'Republic of Balochistan announced'चा ट्रेंड

पाकिस्तानमध्ये सोन्याचे प्रचंड साठे लपलेले आहेत
बलुचिस्तानमध्ये असलेली रेको डिक खाण ही जगातील सर्वात मोठ्या अविकसित खाणींपैकी एक आहे. येथून 50 वर्षे दरवर्षी 2 लाख टन तांबे आणि 2.5 लाख औंस सोने काढता येईल. सौदी अरेबिया या खाणीत गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. सौदी भारताचा मित्रदेश आहे.

भारताच्या मित्राने पाकिस्तानला पाठिंबा दिला
पाकिस्तानी मंत्री मुसादिक मलिक म्हणाले की, रेको डिक खाणीत सौदी गुंतवणुकीबाबतच्या चर्चेत बरीच प्रगती झाली आहे. सौदीची मनारा मिनरल कंपनी पुढील 6 महिन्यांत या खाणीतील हिस्सा खरेदी करू शकते. लवकरच मोठी घोषणा होऊ शकते. तथापि, ही बातमी भारतासाठी मोठा धक्कादायक आहे. तसेच, या डीलमुळे पाकिस्तानला जो काही आर्थिक लाभ मिळणार असेल, तो भारतासाठी धोक्याची घंटा आहे. कारण, या लाभामुळे भारतविरोधी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानला आर्थिक बळ मिळेल.

फ्रेमवर्क तयार
गेल्या वर्षी सौदी अरेबियाने या खाणीतील 15% हिस्सा खरेदी करण्याची ऑफर दिली होती. आता मूल्यांकन चौकट तयार झाली आहे, त्यामुळे करार अंतिम होण्याची अपेक्षा आहे. हा करार पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी गेम-चेंजर ठरू शकतो. पण ही बाब एवढ्यावरच मर्यादित न राहता, भारताला काळजी पाडणारी बाब आहे. कारण, या सोन्याच्या खाणीमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मजबूती मिळण्यापेक्षाही पाकिस्तानाच्या नसत्या उपद्व्यापांमध्ये भर पडण्याची पूर्ण शक्यता आहे. यामुळे भारताची डोकेदुखी वाढणार आहे.

सौदी अरेबिया का रस दाखवत आहे?
तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सौदी अरेबिया खाण क्षेत्रात गुंतवणूक वाढवत आहे. रेको डिकची अफाट संपत्ती त्याच्या रणनीतीचा एक भाग आहे. गेल्या वर्षी मनारा मिनरल्सनेही या प्रकल्पाला भेट दिली होती. पाकिस्तानातील ही खाण जगातील खाण-व्यवसायात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या कोणत्याही देशाला आणि तेथील कंपन्यांना खुणावणारी आहे. शिवाय, पाकिस्तानातील अंदाधुंदी सरकार, लष्कराचा देशातला अतिहस्तक्षेप आणि भविष्याविषयी कोणतीही दिशा किंवा धोरण निश्चित नसल्यामुळे याचा फायदा उचलण्यास अनेक देश उत्सुक असू शकतात.
आखाती देशही या खाणीत उत्खनन करण्यात रस दाखवत आहेत
सौदी अरेबिया व्यतिरिक्त, इतर आखाती देश देखील पाकिस्तानच्या खाण क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी चर्चा करत आहेत. परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी पाकिस्तानला या खाणीचा फायदा घ्यायचा आहे.

पाकिस्तानच्या गरिबीत एक जीवनरक्षक
पाकिस्तानचे कर्ज त्यांच्या जीडीपीच्या 42% पर्यंत पोहोचले आहे. रेको डिकमधील आपला हिस्सा विकून पाकिस्तान सध्या तरी मोठा नफा कमवू शकतो. देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यात ही खाण महत्त्वाची भूमिका बजावू शकते. मात्र, या सोन्याच्या खाणीवर बसलेला पाकिस्तान नावाचा साप भारताच्या विरोधात पुन्हा फणा काढून बसू शकतो.

मालकी हक्क कोणाकडे आहेत?
या खाणीत पाकिस्तान सरकारचा 50% हिस्सा आहे, तर उर्वरित हिस्सा कॅनडाच्या बॅरिक गोल्ड कॉर्पकडे आहे. सौदी अरेबिया पाकिस्तानचा 15% हिस्सा खरेदी करण्याची तयारी करत आहे. या करारामुळे या खाणीच्या विकासाला गती मिळू शकते.

रेको डिक खाण किती मोठी आहे?
तज्ज्ञांचा अंदाज आहे की, या खाणीत 40 ट्रिलियन टन सोने असू शकते, ज्याची किंमत एक ट्रिलियन डॉलर्स आहे. 1995 मध्ये, फक्त 4 महिन्यांत 200 किलो सोने आणि 1700 टन तांबे काढण्यात आले. 

रेको डिक खाणीवरून वाद
या खाणीवरून पाकिस्तान सरकार आणि बॅरिक गोल्ड कॉर्पमध्ये वर्षानुवर्षे वाद सुरू आहे. आता सौदी गुंतवणूक या प्रकल्पाला एक नवीन दिशा देऊ शकते.

दरवर्षी किती सोने काढले जाईल?
ब्लूमबर्गच्या मते, या खाणीतून दरवर्षी 2 लाख टन तांबे आणि 2.5 लाख औंस सोने काढता येईल. ही खाण पुढील 50 वर्षांसाठी पाकिस्तानची अर्थव्यवस्था मजबूत करू शकते.

हेही वाचा - भारत-पाकिस्तान तणावात चीनची मोठी खेळी! तालिबानला हाताशी धरून भारताला घेरण्याचा भयंकर डाव

खाण कोणाची? बलुचिस्तानची की पाकिस्तानची?
बलुचिस्तानमध्ये स्थित, रेको डिक प्रकल्प कॅनडास्थित खाण कंपनी बॅरिक गोल्ड कॉर्प कंपनीद्वारे चालवला जातो. ही खाण बॅरिक गोल्ड (50 टक्के), पाकिस्तान सरकार (25 टक्के) आणि बलुचिस्तान सरकार (25 टक्के) यांच्या संयुक्त मालकीची आहे. सध्या तरी जगाच्या नकाशावर बलुचिस्तान हा पाकिस्तानचाच एक भाग आहे. मात्र, काही काळापासून स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी अधिक जोर पकडू लागली आहे. बलुची जनतेला पाकिस्तानच्या कह्यातून स्वतःला आणि स्वतःच्या पुढच्या पिढ्यांना सोडवून घेण्याची इच्छा आहे. पाकिस्तान सरकार आणि लष्कर बलुचिस्तानातील साधनसंपत्तीचा हवा तसा वापर करून घेते. मात्र, तेथील लोकांच्या तोंडाला पाने पुसली जातात, असे या लोकांचे म्हणणे आहे. यामुळे हे लोक पाकिस्तान सरकारच्या पूर्णपणे विरोधात आहेत. तसेच, भारताने बलुचिस्तान स्वतंत्र होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करत आहेत. ते संयुक्त राष्ट्रांकडेही स्वतंत्र बलुचिस्तानला मान्यता मिळावी, हीच मागणी करत आहेत. त्यांनी बलुचिस्ताच्या स्वातंत्र्याची स्वतःच घोषणा केली असून त्यांचा स्वतःचा ध्वज आणि राष्ट्रगानही तयार केले आहे. त्यांनी भारतीयांसाठी व्हिसा देण्याचीही घोषणा केली आहे.

स्वतंत्र बलुचिस्तानला मान्यता मिळाल्यास ही संपूर्ण खाण बलुचिस्तानच्या नकाशात असेल. तसेच, बलुचिस्तान हा भारताचा मित्रदेश असेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, असे झाल्यास पाकिस्तानला गुडघ्यावर उभे राहणेही अवघड होईल. कारण, पाकिस्तानची अर्थव्यवस्था बहुतांशी  बलुचिस्तानवरच अवलंबून आहे. यामुळे स्वतंत्र बलुचिस्तानची निर्मिती होणे ही बाब सद्यस्थितीत भारतासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मात्र, जगाच्या नकाशावर स्वतंत्र बलुचिस्तान कागदोपत्री कधी दिसेल, हे कधी होणार याला किती वेळ लागेल, हे सर्व चित्र सध्या तरी अस्पष्ट आहे.


सम्बन्धित सामग्री