Indian Origin Man Died in Canada : कॅनडाच्या एडमॉन्टन शहरातील एका रुग्णालयातला एक धक्कादायक आणि संतापजनक गलथानपणा समोर आला असून, उपचारांसाठी तब्बल 8 तासांच्या प्रतीक्षेनंतर एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. 44 वर्षीय प्रशांत श्रीकुमार याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला असतानाही रुग्णालयाने त्यांना तब्बल 8 तास ताटकळत ठेवले; ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना 25 डिसेंबर 2025 रोजी घडली.
"पप्पा, मला प्रचंड वेदना होत आहेत"
प्रशांत हे मूळचे भारतीय असून ते आपल्या पत्नी आणि 10 व 14 वर्षांच्या मुलांसह कॅनडात राहत होते. 22 डिसेंबर रोजी कामावर असताना त्यांना छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. एका ग्राहकाने त्यांना तातडीने साऊथ-ईस्ट एडमॉन्टनमधील 'ग्रे नन्स हॉस्पिटल' (Grey Nuns Hospital) येथे नेले. तिथे पोहोचल्यावर त्यांच्या वडिलांनी पाहिले की, प्रशांत वेदनेने व्याकुळ होते. त्यांनी आपल्या वेदनेची तीव्रता 10 पैकी 15 अशी सांगितली होती, तरीही, त्यांना तातडीने उपचार देण्याऐवजी वेटिंग रूममध्ये बसवण्यात आले.
आठ तासांचा जीवघेणा हलगर्जीपणा
रुग्णालयाने सुरुवातीला प्रशांतची ECG चाचणी केली; परंतु, त्यात काहीही गंभीर नसल्याचे सांगत त्यांना थांबण्यास सांगितले. वेदना कमी करण्यासाठी त्यांना केवळ साधे 'टायलेनॉल' (Tylenol) देण्यात आले. त्यांचे वडील कुमार श्रीकुमार यांनी सांगितले की, नर्स जेव्हा जेव्हा त्यांचा रक्तदाब (BP) तपासत होत्या, तेव्हा तो खूपच वाढलेला होता. तब्बल 8 तास उलटल्यानंतर जेव्हा त्यांना उपचारांसाठी आत बोलावण्यात आले, तेव्हा अवघ्या 10 सेकंदात प्रशांत आपल्या छातीवर हात धरून वडिलांच्या समोर कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा – University of Toronto: PhD चे स्वप्न राहिले अर्धवट; टोरांटोमधील गोळीबारात भारतीयाचा मृत्यू
एक हसते-खेळते कुटुंब उद्ध्वस्त
प्रशांत हा एक कुटुंबवत्सल माणूस होता. त्यांना आपल्या मुलांसोबत प्रवासाला जायला खूप आवडायचे. त्यांच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. "रुग्णालय आणि आरोग्यव्यवस्थेकडून आम्हाला चांगल्या वागणुकीची अपेक्षा होती, पण त्यांनी माझ्या मुलाचा नाहक बळी घेतला," अशी भावना त्यांच्या वडिलांनी व्यक्त केली. स्थानिक समुदायासाठी ही घटना अत्यंत धक्कादायक असल्याचे त्यांचे मित्र वरिंदर भुल्लर यांनी सांगितले.
रुग्णालय प्रशासनाची सावध भूमिका
या गंभीर प्रकरणावर रुग्णालय प्रशासनाने थेट भाष्य करण्यास नकार दिला आहे. रुग्णाची गोपनीयता पाळणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी केवळ मृताच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. सध्या मुख्य वैद्यकीय परीक्षक या प्रकरणाची सविस्तर चौकशी करत असून, आठ तास चाललेल्या या प्रक्रियेत नेमकी कुठे चूक झाली, याचा शोध घेतला जात आहे.