Wednesday, July 09, 2025 09:41:04 PM

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

रविवारी सकाळी अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी संवाद साधला.

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
Edited Image

नवी दिल्ली: सध्या इराण आणि इस्त्रायलमध्ये तीव्र युद्द सुरू आहे. दरम्यान, रविवारी सकाळी अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधानांनी याबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती दिली आहे. 

पंतप्रधान मोदींनी एक्सवर लिहिले की, 'आम्ही सध्याच्या परिस्थितीबद्दल सविस्तर चर्चा केली. तातडीने तणाव कमी करण्यासाठी, संवाद आणि राजनैतिकतेकडे वाटचाल करण्यासाठी आमचे आवाहन पुन्हा एकदा मांडले असून प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थिरता लवकरात लवकर पुनर्संचयित करण्याबद्दल चर्चा केली आहे.'

हेही वाचा - US Airstrikes Iran: अमेरिकेचे इराणच्या तीन अणु प्रकल्पांवर हवाई हल्ले; नेतन्याहू म्हणाले, ‘अभिनंदन ट्रम्प..

पेझेश्कियान यांचा पंतप्रधान मोदींना फोन - 

दरम्यान, इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांनी इराणी अणुस्थळांवर अमेरिकेच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. राष्ट्रपती पेझेश्कियान यांनी पंतप्रधान मोदींना सध्याच्या परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. हा फोन 45 मिनिटे चालला. राष्ट्रपतींनी भारताचे प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थिरता वाढवणारा मित्र आणि भागीदार म्हणून वर्णन केले. तसेच तणाव कमी करण्यासाठी, संवाद आणि राजनैतिकतेसाठी भारताच्या भूमिकेबद्दल आणि आवाहनाबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले. 

हेही वाचा - पाकिस्तानने नोबेल शांतता पुरस्कारासाठी सुचवले डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव

अमेरिकेचा इस्रायलला पाठींबा - 

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायलमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही बाजूंनी सतत क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहेत. या तणावपूर्ण परिस्थितीत अमेरिकेने इस्त्रायलला पाठींबा दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी यापूर्वी सांगितले होते की ते इराणविरुद्धच्या युद्धात इस्रायलला पाठिंबा देण्याबाबत दोन आठवड्यात निर्णय घेतील. आता अमेरिकेने इस्रायलला पाठींबा देत रविवारी पहाटे इराणवर हल्ला केला. 
 


सम्बन्धित सामग्री