इस्रायल: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक राजनैतिक क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांकडून सर्वोच्च राज्य सन्मान प्राप्त करणाऱ्या निवडक जागतिक नेत्यांच्या यादीत स्थान मिळवले आहे. पंतप्रधान मोदी सध्या इस्रायलच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर असून, गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळातील हा त्यांचा दुसरा इस्रायल दौरा आहे. यापूर्वी त्यांनी 2017 मध्ये भेट दिली होती.
या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी इस्रायली संसदेचे म्हणजेच केनेस्सेट (Knesset Israeli Parliament) यांना संबोधित करत इतिहास रचला. इस्रायलच्या संसदेला संबोधित करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. त्यांच्या भाषणावेळी संसदेतील सदस्यांनी ‘मोदी, मोदी' घोषणांसह जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. भाषणानंतर त्यांना केनेस्सेटचा सर्वोच्च सन्मान असलेले ‘स्पीकर ऑफ द केनेस्सेट मेडल’ प्रदान करण्यात आले.
भारत-इस्रायल संबंध अधिक दृढ करण्यासाठी केलेल्या वैयक्तिक नेतृत्व आणि योगदानाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर प्रतिक्रिया देत हा सन्मान नम्रतेने स्वीकारत असल्याचे म्हटले. हा गौरव एखाद्या व्यक्तीचा नसून भारत आणि इस्रायलमधील दृढ मैत्रीचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा: PM Modi Letter For Vijay and Rashmika : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाला दिल्या खास शुभेच्छा, पत्र लिहित म्हणाले, 'लग्न समारंभाचे आमंत्रण मिळाल्याने...'
यापूर्वी 2018 मध्ये पंतप्रधान मोदी यांना पॅलेस्टाईनचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन’ प्रदान करण्यात आला होता. परदेशी राष्ट्रप्रमुख, राजा किंवा सरकार प्रमुखांना दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान असून, पॅलेस्टाईनला अधिकृत भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले होते. त्यावेळी पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी मोदी यांच्या धाडसी नेतृत्वाचे आणि जागतिक शांततेसाठीच्या योगदानाचे विशेष कौतुक केले होते.
केनेस्सेटमधील आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि इस्रायलमधील हजारो वर्षांपूर्वीपासूनचे सांस्कृतिक व व्यापारी संबंध अधोरेखित केले. ‘बुक ऑफ एस्थर’ (Book of Esther) आणि ‘तालमुद’ (Talmud) यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये भारताचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हमास दहशतवादी संघटनेने 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत भारत इस्रायलसोबत ठामपणे उभा असल्याचा पुनरुच्चार केला.
दहशतवादाविरोधातील भारताची ‘झिरो टॉलरन्स’ (Zero Tolerance Against Terrorism) भूमिका स्पष्ट करत त्यांनी 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचाही उल्लेख केला. याचबरोबर गाझा प्रदेशात दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेल्या शांतता उपक्रमांना भारताचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. भारताच्या संसदेने इस्रायलसाठी संसदीय मैत्री गट स्थापन केल्याची माहिती देत दोन्ही देशांतील लोकप्रतिनिधींमध्ये अधिक संवाद वाढवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा: Cyber Fraud Crime: सात कोटींचा सायबर डल्ला; 'म्यूल अकाउंट्स'चे मोठे रॅकेट उद्ध्वस्त; घोटाळ्याचा असा झाला पर्दाफाश