Russia-India Oil Trade: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, रशियाने भारताला एक अत्यंत महत्त्वाचे आणि दिलासादायक आश्वासन दिले आहे. जर भारताला तेल आणि वायू पुरवठ्याचा तुटवडा जाणवला, तर रशिया भारताची संपूर्ण ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यास तयार असल्याचे रशियाने स्पष्ट केले आहे. रशियन फेडरेशन दूतावासाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही भारताच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहोत. रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनीही रशियाचा भारताला असलेला पाठिंबा अधोरेखित केला आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी आणि भारताची चिंता
इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा केल्यामुळे भारताची चिंता वाढली आहे. ओमान आणि इराण दरम्यान असलेली ही सामुद्रधुनी जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची असून, जगातील 31 टक्के कच्च्या तेलाचे टँकर येथून जातात. धक्कादायक बाब म्हणजे, भारताचे सुमारे 50 टक्के तेल टँकर याच मार्गावरून प्रवास करतात. कतारने त्यांच्या प्रमुख तेल सुविधांवर ड्रोन हल्ले झाल्यानंतर एलएनजीचा पुरवठा थांबवला असल्याने भारताला आता इतर पर्यायांचा शोध घेणे गरजेचे बनले आहे.
भारताची सज्जता आणि पर्यायी व्यवस्था
वाढत्या तणावादरम्यान, भारताच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने देशात कच्च्या तेलाचा आणि आवश्यक इंधनांचा (पेट्रोल, डिझेल आणि एटीएफ) पुरेसा साठा असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे अल्पकालीन पुरवठा खंडित झाल्यास देशाला मदत होईल. तसेच, भारतीय कंपन्यांनी आता या तणावग्रस्त भागातून तेल वाहतूक करणे टाळले आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, गरज पडल्यास भारत सरकार इंधन निर्यातीवर निर्बंध लादण्याचा किंवा औद्योगिक वापरासाठी पर्यायी इंधनांचा वापर सक्तीचा करण्याचा विचार करू शकते.
रशिया-भारत तेल व्यापार
युक्रेन युद्धानंतर भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात स्वस्त तेल आयात करण्यास सुरुवात केली होती. एकेकाळी ही आयात 35-40 टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेलावर 50 टक्के कर लादल्यानंतर आणि अमेरिकेसोबत व्यापार करार झाल्यानंतर भारताने रशियाकडून होणारी आयात मर्यादित केली आहे. तथापी, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत रशियाने दिलेले मदतीचे आश्वासन भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.