Russia Attack on Ukraine: रशिया-युक्रेन युद्ध अधिकच पेटलं आहे. शुक्रवारी रात्री रशियाने इस्कंदर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी युक्रेनची राजधानी कीववर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात ऊर्जा पायाभूत सुविधा आणि रेल्वे व्यवस्था पूर्णतः कोलमडली, तर 4 नागरिकांचा मृत्यू आणि डझनभर लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
कीवच्या वीज व्यवस्थेचा 40 टक्के भाग उद्ध्वस्त
रशियन क्षेपणास्त्रांनी कीवच्या बाहेरील वीज प्रकल्प आणि रेल्वे जंक्शनला लक्ष्य केले. सुमारे 11 वाजताच्या सुमारास सुरू झालेल्या हल्ल्यात 500 किमीपर्यंतच्या मारक क्षमतेच्या आणि 700 किलोग्रॅम स्फोटकवाहू इस्कंदर क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी सांगितले, 'आमच्या ऊर्जा यंत्रणेचा 40 टक्के भाग उद्ध्वस्त झाला आहे. हजारो घरे वीजविरहित आहेत आणि रुग्णालये जनरेटरवर चालवावी लागत आहेत.'
हेही वाचा - India America Trade: टॅरिफपेक्षा मोठं संकट! भारत-अमेरिकेच्या 'या' करारामुळे शेतकऱ्यांना बसणार मोठा आर्थिक फटका
रेल्वे सेवा ठप्प, नागरी जीवन विस्कळीत
रेल्वे ट्रॅक उद्धवस्त झाल्याने आणि प्रमुख गाड्या रद्द झाल्याने युक्रेनचा रेल्वे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. युक्रेनियन रेल्वे प्रमुखांनी सांगितले की, 'दुरुस्तीसाठी किमान एक आठवडा लागेल.' युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी हल्ल्यानंतर म्हटलं की, 'हा आमच्या लोकांना संपवण्याचा प्रयत्न आहे. जगाने आता रशियाची आक्रमकता थांबवली पाहिजे.'
हेही वाचा - North Korea-USA Relations: आशिया दौऱ्यादरम्यान नवं समीकरण! डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली किम जोंग उन यांची भेट घेण्याची इच्छा
रशियाने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी
दरम्यान, रशियाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली, मात्र त्याचे लक्ष्य 'फक्त लष्करी ठिकाणे' असल्याचा दावा केला. तथापी, युक्रेनने नागरी पायाभूत सुविधा जाणीवपूर्वक उद्ध्वस्त केल्याचे पुरावे सादर केले आहेत. संयुक्त राष्ट्रांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली असून, युरोपियन युनियनने आपत्कालीन बैठक बोलावली आहे.