Vladimir Putin On Russia Ukraine War: डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनला युद्ध थांबवण्याचे आवाहन केले होते. ट्रम्प यांच्या या आवाहनानंतर आता व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनियन सैनिकांबाबत एक महत्त्वाचं विधान केलं आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून संघर्ष सुरु आहे. रशिया सातत्याने युक्रेनवर हल्ले करत असून यामध्ये युक्रेनची अनेक शहरे उद्ध्वस्त होत आहेत. यात युक्रेनियन सैनिक आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली.
युक्रेन-रशियातील हा संघर्ष थांबण्यासाठी आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी सफल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युक्रेनने तत्काळ युद्धबंदी लागू करण्यास तयारी दर्शवल्यानंतर सध्या चर्चांच्या फेऱ्या सुरु आहेत. यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी आग्रह धरल्यानंतर युक्रेनने एका महिन्याच्या युद्धबंदीला संमती दर्शवली होती. आता ट्रम्प यांच्या युद्धबंदी प्रस्तावावर व्लादिमीर पुतिन हे सहमत असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, रशियाने यामध्ये अट घातली आहे.
हेही वाचा - 'अपहरण केलेली ट्रेन सोडवली' हे साफ खोटं! ओलिसांची सुटका झालीये तर फोटो दाखवा; पाकिस्तानी सैन्याला बलुच बंडखोरांचे आव्हान
युद्धबंदी प्रस्तावानंतर युक्रेनसाठी काही अटी-शर्तींची मागणी व्लादिमीर पुतिन यांनी केली आहे. यातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी एक महत्त्वाची विनंती व्लादिमीर पुतिन यांना केली होती. त्यांनी युक्रेनियन सैनिकांना जिवंत सोडण्याची मागणी केल्याचं म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या आवाहनानंतर आता व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनियन सैनिकांबाबत एक महत्त्वाचं विधान केलं आहे.
‘जर युक्रेनियन सैन्याने आत्मसमर्पण केलं तर त्यांचे प्राण वाचतील’, असं व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांना रशियाने पूर्णपणे वेढलेल्या युक्रेनियन सैन्याचे प्राण वाचवण्याची विनंती केल्यानंतर व्लादिमीर पुतिन यांनी त्यासाठी तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यासाठी युक्रेनियन सैन्याने आत्मसमर्पण करावे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता याबाबत युक्रेनियन सैन्य काय करणार? याकडे जगाचं लक्ष लागलेलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांना काय विनंती केली?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या प्लॅटफॉर्मवर लिहीलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, “रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन आणि आमच्यात काल खूप चांगली आणि उपयुक्त चर्चा झाली आणि हे भयानक, रक्तरंजित युद्ध अखेर संपुष्टात येण्याची शक्यता आहे. पण या क्षणाला हजारो युक्रेनियन सैनिक हे पूर्णपणे रशियन लष्कराने वेढलेले आहेत आणि ते खूप वाईट स्थितीत आहेत. मी व्लादीमीर पुतिन यांच्याकडे त्या सैनिकांना जिवंत सोडण्यासाठी विनंती केली आहे. जर या सैनिकांना वाचवले नाही, तर हा एक भीषण नरसंहार असेल, जो दुसर्या महायुद्धानंतर कधीही पाहिला गेला नाही. देव त्या सर्वांचे रक्षण करो,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं.
हेही वाचा - 'पाकिस्तान निव्वळ थापा मारत आहे!,' जाफर एक्सप्रेस अपहरणासंदर्भात बलुच चळवळीतील कार्यकर्त्याचा आरोप