Donald Trump Says 7 Brand New Beautiful Planes were Shot Down : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील सशस्त्र संघर्षावर पुन्हा एकदा भाष्य केले आहे. मे महिन्यात पहलगाम हल्ल्यानंतर भारताने राबवलेले 'ऑपरेशन सिंदूर' थांबवण्यासाठी आपण मध्यस्थी केल्याचा दावा ट्रम्प यांनी अनेकदा केला आहे. भारताने हा दावा वारंवार फेटाळला असतानाही, ट्रम्प त्यांच्या यशस्वी मध्यस्थीबद्दल स्वतःच जगभर डंका पिटत आहेत. नुकतेच जपानच्या दौऱ्यावर असताना त्यांनी जागतिक नेत्यांशी संवाद साधताना याचा पुनरुच्चार केला.
'7 सुंदर लढाऊ विमाने पाडली' म्हणत मध्यस्थीचा पुन्हा दावा
मंगळवारी जपान दौऱ्यावर असताना जागतिक व्यापारी नेते आणि अमेरिकन सैन्यांसमोर एका डिनरवेळी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "मे महिन्यात मी व्यापाराच्या माध्यमातून भारत-पाकिस्तानमधील संघर्ष थांबवू शकलो आणि या माध्यमातून मी जगाची मोठी सेवा केली आहे." यावेळी त्यांनी संघर्षाबद्दल एक मोठा दावा केला. ते म्हणाले, "या संघर्षात सात नवीकोरी आणि सुंदर लढाऊ विमाने पाडली गेली."
हेही वाचा - North Korea Missile Test: उत्तर कोरियाची समुद्रातून क्रूझ क्षेपणास्त्र चाचणी; अमेरिकेला दिला इशारा
'टॅरिफ'च्या जोरावर युद्ध थांबवले
ट्रम्प यांनी या संघर्षात 'टॅरिफ' (Tariff) चा वापर केल्याचे सांगितले. ट्रम्प म्हणाले, "मी आतापर्यंत जितके युद्ध थांबवले आहेत, ते सर्व टॅरिफच्या जीवावर थांबवले. व्यापार आणि टॅरिफच्या माध्यमातून मी जगाची मोठी सेवा केली आहे." त्यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा उल्लेख अण्वस्त्रधारी देश असा केला आणि व्यापाराच्या माध्यमातून आपण त्यांचा संघर्ष थांबवू शकलो, असे ठामपणे सांगितले. याआधी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाही त्यांनी आपल्या टॅरिफच्या धमक्यांद्वारे जगभरातील आठ जागतिक संघर्षात यशस्वी मध्यस्थी केल्याचा दावा केला होता.
मोदी आणि मुनीर यांच्यासोबतचा संवाद
मंगळवारी जपानमध्ये बोलताना ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्यासोबत संवाद झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, "जर तुम्ही भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षाकडे पाहिले, तर ते एकमेकांवर हल्ला करत होते. अणुशक्ती असलेले दोन मोठे देश एकमेकांसमोर उभे ठाकले होते." यावेळी आपण पंतप्रधान मोदींना "तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात" असे म्हटले, तर पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांना "जर तुम्ही असेच लढत असाल, तर तुमच्याबरोबर आम्ही व्यापार करणार नाही" असा इशारा दिल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
हेही वाचा - US Operations In Pacific: ड्रग तस्करी रोखण्यासाठी अमेरिकेचा पॅसेफीक समुद्रात हल्ला; कारवाईत 14 ठार, 4 नौका नष्ट