Sunday, March 08, 2026 12:13:45 PM

जगाला निकृष्ट दर्जाचा माल विकणाऱ्या चीनचा रस्ताही निघाला 'चायनामेड'; पाहा कसा झाला गायब, CCTV फुटेज व्हायरल

शांघायमधील एका गर्दी असलेल्या चौकात ही घटना घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, रस्ता अचानकपणे खाली जाऊ लागतो. त्या ठिकाणी एक मोठा खड्डा तयार होऊ लागतो आणि त्यानंतर..

जगाला निकृष्ट दर्जाचा माल विकणाऱ्या चीनचा रस्ताही निघाला चायनामेड पाहा कसा झाला गायब cctv फुटेज व्हायरल

Sinkhole Swallowed China-Made Road in Shanghai : चीनमधील शांघाय शहरात रस्ता अचानक जमिनीच्या पोटात गडप झाल्याची भीषण घटना समोर आली आहे. या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून, यामध्ये गर्दीच्या रस्त्याचा मोठा भाग एका क्षणात खोल खड्ड्यात (Sinkhole) कोसळताना दिसत आहे.

डोळ्याचे पाते लवते न लवते तोच रस्ता खचला
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, या रस्त्यावरून नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू असताना अचानक जमिनीचा एक मोठा भाग खाली खचू लागतो. काही सेकंदातच तेथे एक मोठा आणि खोल खड्डा तयार होतो, जो रस्त्यावरील पदपथ आणि आजूबाजूच्या बांधकामांनाही गिळंकृत करतो. सुदैवाने, या घटनेच्या वेळी रस्ता कोसळलेल्या भागावर कोणतेही वाहन नव्हते, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली असली तरी या घटनेने शहर प्रशासनाच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

शांघायमध्येच अशा घटना का घडतात?
शांघाय हे शहर भौगोलिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानले जाते. यामागे अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणे आहेत:
- मऊ माती (Soft Alluvial Soil): शांघायची जमीन प्रामुख्याने चिकणमाती आणि वाळूच्या थरांनी बनलेली आहे, जी वजनामुळे सहज दबली जाऊ शकते.
- भूगर्भातील पाण्याची उपसा: गेल्या अनेक दशकांपासून जमिनीखालील पाण्याचा प्रचंड उपसा झाल्यामुळे मातीमधील पोकळी वाढली आहे.
- पायाभूत सुविधांचा अभाव: जुन्या ड्रेनेज लाईन आणि सांडपाण्याच्या पाईपलाईन फुटल्यामुळे जमिनीखालची माती वाहून जाते, ज्यामुळे वरून रस्ता मजबूत दिसत असला तरी आतून तो पोकळ होतो.

हेही वाचा - Ajit Pawar Viral News Fact Check : अजित पवार यांनी कुटुंबियांना सांगितलेला गुंतवणुकीचा मार्ग, अखेरच मृत्युपत्र; काय आहे यामागील सत्य?, जाणून घ्या Fake न्यूजचं Fact

आकडेवारीतून समोर आलेले धक्कादायक वास्तव
शांघायमधील 'मिन्हांग' (Minhang) जिल्ह्यात अलीकडेच अशाच प्रकारचा 10 मीटर खोल खड्डा पडला होता, ज्यामागे खराब झालेली पाईपलाईन हे कारण होते. चीनमधील एका अभ्यासानुसार, 2017 ते 2023 या काळात घडलेल्या सिंकहोलच्या घटनांपैकी सुमारे 72% घटना या मानवी हस्तक्षेपामुळे घडल्या आहेत. वाढते शहरीकरण, जमिनीखालील बांधकामे (उदा. मेट्रो) आणि वाढती लोकसंख्या यामुळे जमिनीवर येणारा ताण या खचणाऱ्या रस्त्यांसाठी जबाबदार धरला जात आहे.

प्रशासनाकडून सुरक्षेचा आढावा
या घटनेनंतर शांघाय शहर प्रशासनाने संपूर्ण परिसरातील रस्ते आणि जमिनीखालील पाईपलाईन्सचे 'सेफ्टी ऑडिट' करण्याचे आदेश दिले आहेत. शांघाय शहर गेल्या काही वर्षांपासून प्रतिवर्षी सुमारे 1 सेंटीमीटर या दराने खचत असल्याचे (Land Subsidence) तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जमिनीखालील पाणी उपशावर निर्बंध घालणे आणि अत्याधुनिक सेन्सरद्वारे जमिनीच्या हालचालींवर लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे.

हेही वाचा - Viral Video: मालक चावी विसरला आणि चक्क मनीमाऊने उघडला दरवाजा; व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांची जिंकली मनं


सम्बन्धित सामग्री