Tuesday, November 18, 2025 09:35:09 PM

US Navy Fighter Jet Crash: अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली; पायलट-क्रू सुरक्षित, तपास सुरू

दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्या दोन विमान अपघातांत पायलट-क्रू सुखरूप बचावले. यूएसएस निमित्झवरून उड्डाण केलेल्या विमानांवर तांत्रिक तपास सुरू आहे.

us navy fighter jet crash अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली पायलट-क्रू सुरक्षित तपास सुरू

दक्षिण चीन समुद्रात रविवारी अमेरिकेची नौदलाचे दोन विमाने अपघातीरीत्या कोसळल्याच्या घटना घडल्या. दोन स्वतंत्र प्रसंगांमध्ये एक लढाऊ विमान आणि एक नौदलाचे हेलिकॉप्टर खाली कोसळले. मात्र, दोन्ही विमानांतील पायलट आणि क्रू सदस्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून, मोठी जीवितहानी टळली आहे.

अमेरिकन नौदलाच्या पॅसिफिक फ्लीटच्या माहितीनुसार, एमएच-60आर सी-हॉक हेलिकॉप्टर हे विमानवाहू जहाज यूएसएस निमित्झ वरून नियमित मोहिमेसाठी उड्डाण केल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत कोसळले. हा अपघात स्थानिक वेळेनुसार दुपारी सव्वा दोनच्या सुमारास झाला. तीनही क्रू सदस्यांना बचाव पथकाने तातडीने सुरक्षित बाहेर काढले.

या घटनेनंतर अवघ्या अर्ध्या तासात, म्हणजेच दुपारी 3.15 वाजता, त्याच विमानवाहू जहाजावरून उड्डाण केलेले एफ/ए-18एफ सुपर हॉर्नेट लढाऊ विमानही कोसळले. हे विमानदेखील नियमित सराव मोहिमेचा भाग होते. विमानातील पायलटने वेळीच बाहेर पडून स्वत:चा जीव वाचवला आणि त्याला सुखरूप बचावण्यात आले.

हेही वाचा: ISRO LVM3 Mission: CMS-03 उपग्रहामुळे नौदलाला मिळणार सुपर कम्युनिकेशन क्षमता; प्रक्षेपणासाठी काउंटडाउन सुरू, भारताची ताकद वाढणार

या दोन्ही अपघातांची चौकशी सुरू करण्यात आली असून तांत्रिक कारणे काय होती, याचा तपास करण्यात येत आहे. यूएसएस निमित्झ हे युद्धनौकादल पश्चिम किनाऱ्याकडे परतण्याच्या अंतिम टप्प्यात असून, गेल्या काही महिन्यांत पश्चिम आशिया क्षेत्रात हूती बंडखोरांच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी तैनात करण्यात आले होते. 17 ऑक्टोबरला हे जहाज दक्षिण चीन समुद्रात दाखल झाले.

दक्षिण चीन समुद्रातील हालचालींना विशेष कूटनीतिक आणि सामरिक महत्त्व असल्याने, या अपघातांकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरही लक्ष वेधले गेले आहे. विशेष म्हणजे, चीन या संपूर्ण परिसरावर दावा करतो, तर फिलीपिन्ससह अनेक देश चीनच्या दाव्याला आक्षेप घेत आहेत.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने चीनच्या दाव्यांना आधीच नकार दिला असूनही, चीन या भागात लष्करी सक्रियता वाढवत आहे. याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिका आपल्या युद्धनौका आणि विमानवाहू सामग्रीच्या माध्यमातून या समुद्रातील स्वातंत्र्य कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या प्रदेशातील तणाव सतत वाढलेला दिसत आहे.

हेही वाचा: Madras High Court: मद्रास उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय: क्रिप्टोकरन्सीला कायद्याने मालमत्तेचा दर्जा


सम्बन्धित सामग्री