सागरी सुरुंगाच्या धडकेत तेल टँकरचा स्फोट; 20 लाख बॅरल तेलाचा टँकर आगीच्या भक्ष्यस्थानी, होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद

सुमारे 20 लाख बॅरल्सहून अधिक कच्चे तेल वाहून नेणाऱ्या एका भव्य सुपर टँकरचा या मार्गावरून प्रवास सुरू असताना सागरी सुरुंगाशी संपर्क आला.
सागरी सुरुंगाच्या धडकेत तेल टँकरचा स्फोट; 20 लाख बॅरल तेलाचा टँकर आगीच्या भक्ष्यस्थानी, होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद
oil tanker explosion

आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा होर्मुझच्या सामुद्रधुनीचा सागरी मार्ग एका मोठ्या दुर्घटनेमुळे पूर्णपणे ठप्प झाला आहे. सुमारे 20 लाख बॅरल्सहून अधिक कच्चे तेल वाहून नेणाऱ्या एका भव्य सुपर टँकरचा या मार्गावरून प्रवास सुरू असताना सागरी सुरुंगाशी संपर्क आला. या धडकेनंतर टँकरमध्ये अचानक जोरदार स्फोट होऊन भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेमुळे या संपूर्ण सागरी व्यापारी मार्गावरून प्रवास करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सुरक्षेच्या कारणास्तव हा मुख्य तेल वाहतूक मार्ग सागरी वाहतुकीसाठी तत्काळ प्रभावाने बंद करण्यात आला आहे. इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) च्या नौदलाने यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली आहे.

इराणी प्रशासनाकडून सागरी वाहतुकीवर पूर्ण बंदी

दरम्यान, इराणची अधिकृत वृत्तसंस्था ‘IRNA’ ने दिलेल्या माहितीनुसार, इराणी नौदलाने सर्वच देशांच्या व्यापारी आणि मालवाहू जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करण्यास सक्त मनाई केली आहे. प्रशासनाने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, हा सागरी मार्ग सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे असुरक्षित असून पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहील. IRGC चे अधिकृत माध्यम असलेल्या ‘सेपाह न्यूज’ने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित टँकरने अनधिकृत मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला होता. जलमार्गात प्रवेश करताना या टँकरने आपली ओळख आणि अचूक स्थान लपवण्यासाठी रडार यंत्रणा बंद केली होती, असा आरोपही इराणी अधिकाऱ्यांनी केला आहे.

हेही वाचा – मालवाहू जहाजाला अपघात; iPhone अन् अत्तराच्या बाटल्या समुद्रात विखुरल्या, व्हिडीओ व्हायरल

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर भडकण्याची शक्यता

मध्यपूर्वेतील या धक्कादायक घडामोडींमुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण पसरले आहे. जगातील एक चतुर्थांश तेलाची वाहतूक याच समुद्री मार्गावरून होत असल्याने, हा मार्ग बंद झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. आगामी दिवसांत इंधनाचे दर प्रचंड वाढून जागतिक पातळीवर गंभीर ऊर्जा संकट आणि आर्थिक मंदीची परिस्थिती ओढवू शकते, अशी भीती आर्थिक विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version