Strait of Hormuz Supertanker Mine Explosion: होर्मुझ सामुद्रधुनीतील दक्षिण जलमार्गाने प्रवास करणारे एक महाकाय सुपरटँकर इराणच्या नौदलाने पेरलेल्या 2 भूसुरुंगांना धडकून भीषण अपघाताचा बळी ठरले आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) दिलेल्या माहितीनुसार, या जहाजाने इराणने ठरवून दिलेल्या सुरक्षेच्या नियमांचे आणि मार्गांचे उल्लंघन केले होते. भूसुरुंगांशी धडक होताच जहाजाला मोठी आग लागली असून ते समुद्रातच ठप्प झाले आहे. इराणने या टँकरचे नाव किंवा कर्मचाऱ्यांच्या जीवितहानीबद्दल अद्याप अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.
इराणची आंतरराष्ट्रीय जहाजांना थेट ताकीद
या घटनेनंतर इराणच्या लष्कराने होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या सर्व तेल आणि मालवाहू वाहतूक कंपन्यांना कडक इशारा जारी केला आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, जे जहाज इराणने निश्चित केलेल्या सागरी सुरक्षा नियमांचे पालन करणार नाही, त्यांना अशाच गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. तसेच, आंतरराष्ट्रीय जलवाहतूक कंपन्यांनी अमेरिकेच्या लष्कराने दिलेल्या निर्देशांचे किंवा चिथावणीचे पालन करून आपल्या कर्मचाऱ्यांचे प्राण आणि जहाजे धोक्यात घालू नयेत, असेही इराणकडून सांगण्यात आले आहे.
अमेरिकन लष्कर आणि इराणमधील वाद पेटला
दुसरीकडे, अमेरिकन सेंट्रल कमांडने (CENTCOM) म्हटले आहे की होर्मुझची सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांसाठी प्रचंड धोकादायक बनली आहे. अमेरिकन लष्कराने या जलमार्गातील भूसुरुंग हटवण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा केला असला तरी, इराणकडून या भागात पुन्हा भूसुरुंग पेरले जात असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेच्या दाव्यांना आव्हान देत इराणने या घटनेद्वारे संपूर्ण जलमार्गावर स्वतःचे नियंत्रण असल्याचे दाखवून दिले आहे.
जागतिक तेल वाहतूक अन् सुरक्षेवर मोठे सावट
या स्फोटाच्या घटनेमुळे जागतिक तेल पुरवठ्याचा महत्त्वाचा मार्ग असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव अधिक वाढला आहे. आंतरराष्ट्रीय सागरी संघटनांनी (IMO) या भागातून प्रवास करणाऱ्या सर्व जहाजांना अत्यंत काळजी घेण्याचे आणि सुरक्षित मार्गाचा अवलंब करण्याचे निर्देश दिले आहेत. अमेरिकेच्या सुरक्षा छत्रछायेवर अवलंबून राहून बेकायदेशीर मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजाला सोडले जाणार नाही, असा थेट संदेश या घटनेतून इराणने दिल्याचे दिसत आहे.