Sydney Mass Shooting: ऑस्ट्रेलियातील सिडनीत भीषण दहशतवादी हल्ला, अंधाधुंद गोळीबार; 10 ठार

ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातील बॉन्डी बीच येथे हनुक्का सणाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण गोळीबारात सुमारे 10 जणांचा मृत्यू झाला असून 60 हून अधिक जखमी झाले आहेत.

Sydney Mass Shooting: ऑस्ट्रेलियातील सिडनीत भीषण दहशतवादी हल्ला,  अंधाधुंद गोळीबार; 10 ठार

ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात झालेल्या भीषण गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण जग हादरले आहे. या मास शूटिंगमध्ये सुमारे 10 जणांचा मृत्यू झाला असून, 60 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. न्यू साउथ वेल्स पोलिसांनी (New South Wales Police) रविवारी सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार, नऊ नागरिकांसह एक संशयित हल्लेखोर ठार झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला सिडनीतील बॉन्डी बीच (Bondi Beach) येथे आयोजित करण्यात आलेल्या ज्यू धर्मीयांचा हनुक्का (Hanukkah) सणाच्या कार्यक्रमाला लक्ष्य करून करण्यात आला. सूर्यास्ताच्या सुमारास सुरू झालेल्या या धार्मिक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लोक समुद्रकिनारी जमा झाले असताना सायंकाळी सुमारे 6:30 वाजता अचानक गोळीबार सुरू झाला. स्थानिक माध्यमांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओंमध्ये अनेक लोक जमिनीवर पडलेले आणि परिसरात गोंधळ उडाल्याचे दिसून येत आहे. या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज (Anthony Albanese) यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. बॉन्डी बीचवरून समोर आलेली दृश्ये अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: Lionel Messi: वानखेडे स्टेडियमवर ऐतिहासिक क्षण! सचिन तेंडुलकर आणि लिओनेल मेस्सी यांची भेट; ‘या’ खास वस्तूंची केली देवाणघेवाण

पोलिस आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या असून जखमींचे प्राण वाचवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. या घटनेने प्रभावित झालेल्या सर्व कुटुंबांप्रती आपण संवेदना व्यक्त करतो, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी तपास सुरू असून आतापर्यंत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. न्यू साउथ वेल्स पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वरून नागरिकांना आवाहन केले आहे की, तपास पूर्ण होईपर्यंत या परिसरापासून दूर राहावे आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे. पंतप्रधान कार्यालयाकडूनही नागरिकांनी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या घटनेवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही शोक व्यक्त केला आहे. एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी हनुक्का सणाच्या पहिल्याच दिवशी धार्मिक कार्यक्रमाला लक्ष्य करून करण्यात आलेल्या या जघन्य हल्ल्याचा तीव्र निषेध केला. भारताच्या जनतेच्या वतीने पीडित कुटुंबीयांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करत, या दुःखाच्या काळात भारत ऑस्ट्रेलियाच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, सोशल मीडियावर या गोळीबाराचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यामध्ये बॉन्डी बीचवर लोक भीतीने इकडे-तिकडे पळताना, गोळ्यांचे आवाज आणि पोलिस सायरन ऐकू येताना दिसत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, सिडनीमध्ये यापूर्वी 11 वर्षांपूर्वी लिंड्ट कॅफे (Lindt Cafe) येथेही दहशतवादी हल्ला झाला होता. त्या घटनेत दीर्घ काळ चाललेल्या बंदी संकटानंतर दोन नागरिक आणि हल्लेखोराचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा सिडनीने अशाच भीषण हिंसाचाराचा अनुभव घेतला आहे.

हेही वाचा: Udyogini Scheme : महिलांना 3 लाखांपर्यंतचे विनातारण कर्ज! जाणून घ्या उद्योगिनी योजनेविषयी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number