Saturday, February 14, 2026 12:22:30 PM

Snowstorm Tragedy : अमेरिकेतील बर्फाच्छदीत रस्त्यावर विचित्र अपघात; 100 गाड्या एकमेकांवर आदळल्या, तर 30 ट्रकचा झाला चक्काचूर

धुक्यासारखे पसरलेले बर्फ आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे चालकांचे नियंत्रण सुटले आणि एकामागून एक गाड्या एकमेकांना धडकत गेल्या.

snowstorm tragedy  अमेरिकेतील बर्फाच्छदीत रस्त्यावर विचित्र अपघात 100 गाड्या एकमेकांवर आदळल्या तर 30 ट्रकचा झाला चक्काचूर

Snowstorm Tragedy : निसर्गाच्या प्रकोपासमोर प्रगत तंत्रज्ञानही हतबल ठरल्याचे धक्कादायक चित्र अमेरिकेतील मिशिगन राज्यात पाहायला मिळाले. सोमवारी आलेल्या भीषण बर्फाच्या वादळामुळे (Snowstorm) इंटरस्टेट हायवेवर 100 पेक्षा जास्त वाहने एकमेकांवर आदळली. धुक्यासारखे पसरलेले बर्फ आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे चालकांचे नियंत्रण सुटले आणि एकामागून एक गाड्या एकमेकांना धडकत गेल्या.

हायवेवर वाहनांचा ढिगारा; 30 ट्रक अडकले

मिशिगनच्या ग्रँड रॅपिड्स परिसरातील 'इंटरस्टेट 196' या महामार्गावर हा भीषण अपघात झाला. 'फॉक्स न्यूज'ने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 30 पेक्षा जास्त मोठे सेमी-ट्रेलर ट्रक एकमेकांमध्ये घुसले आहेत. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, पोलिसांना महामार्गाच्या दोन्ही बाजूंची वाहतूक त्वरित रोखावी लागली. सुदैवाने, आतापर्यंत या घटनेत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, परंतु अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

काहीच दिसत नव्हतं, फक्त आवाज येत होते... 

एका प्रत्यक्षदर्शी पिकअप ड्रायव्हरने आपला थरार व्यक्त करताना सांगितले की, "वातावरण इतके खराब होते की समोरची गाडीही दिसत नव्हती. आम्ही वेग कमी केला, पण मागून येणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळण्याचे आवाज येत होते. तो क्षण अतिशय भयावह होता." बर्फामुळे रस्ते निसरडे झाल्याने ब्रेक लावूनही गाड्या थांबत नव्हत्या.

प्रवाशांसाठी हायस्कूलमध्ये निवारा

मिशिगनमधील ओटावा काउंटी प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले आहे. अपघातात अडकलेल्या प्रवाशांना बसद्वारे सुरक्षितरित्या 'हडसनविले हायस्कूल'मध्ये हलवण्यात आले आहे. तिथे त्यांच्यासाठी निवास आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे. महामार्गावर पसरलेले गाड्यांचे अवशेष आणि बर्फ हटवण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता असल्याने हा रस्ता सध्या बंद ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा - State Of Catastrophe In Chile : चिली देशात भीषण आग; 18 जणांचा मृत्यू तर 50 हजारांहून अधिक नागरिकांचं स्थलांतर

अमेरिकेच्या अनेक राज्यांना थंडीचा विळखा

नॅशनल वेदर सर्व्हिसने संपूर्ण उत्तर अमेरिकेसाठी कडाक्याच्या थंडीचा इशारा दिला आहे. मिनेसोटा, विस्कॉन्सिन, इंडियाना, ओहायो, पेनसिल्व्हेनिया आणि न्यूयॉर्क या राज्यांत इशारा जारी करण्यात आला आहे. फ्लोरिडा आणि जॉर्जियामध्ये तापमान शून्य अंशांच्या खाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रवास टाळावा, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. 
 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या