Saturday, February 14, 2026 01:35:56 PM

Social Media Ban: टिकटॉक-इन्स्टाग्रामला टाळं; 15 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी

सोमवारी रात्री झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत कायदेकर्त्यांनी 130 विरुद्ध 21 मतांच्या फरकाने या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले.

social media ban टिकटॉक-इन्स्टाग्रामला टाळं 15 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी

Social Media Ban: लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर आणि अभ्यासावर होणारे सोशल मीडियाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी फ्रान्स सरकारने एक अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. फ्रान्सच्या नॅशनल असेंब्लीने 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पूर्णपणे बंदी घालणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. ऑनलाईन गुंडगिरी (Cyber Bullying) आणि हिंसाचाराच्या वाढत्या घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

'नॅशनल असेंब्ली'त मोठ्या बहुमताने विधेयक मंजूर
सोमवारी रात्री झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत कायदेकर्त्यांनी 130 विरुद्ध 21 मतांच्या फरकाने या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले. कनिष्ठ सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर आता हे विधेयक सिनेटमध्ये (वरिष्ठ सभागृह) चर्चेसाठी जाणार आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी हे विधेयक तातडीने मंजूर करण्याचे आवाहन केले असून, आगामी शैक्षणिक वर्षापासून म्हणजे 1 सप्टेंबर 2026 पासून हा कायदा लागू करण्याचा सरकारचा मानस आहे.

"मुलांची स्वप्ने अल्गोरिदमच्या हाती नकोत!" - राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन
या ऐतिहासिक निर्णयानंतर अध्यक्ष मॅक्रॉन यांनी कडक शब्दांत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, "आपल्या मुलांची मने कोणत्याही अमेरिकन किंवा चिनी सोशल मीडिया नेटवर्कसाठी विक्रीसाठी नाहीत. त्यांची स्वप्ने कोणत्या तरी 'अल्गोरिदम'ने ठरवू नयेत. शास्त्रज्ञांची शिफारस आणि जनतेची मागणी लक्षात घेऊनच आम्ही ही बंदी घालत आहोत." मुलांच्या मुक्त विचारांचे रक्षण करणे ही एक लढाई असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आता वय लपवणे होणार कठीण; कडक पडताळणीचे नियम
सध्या अनेक लहान मुले चुकीची जन्मतारीख टाकून इन्स्टाग्राम, टिकटॉक किंवा स्नॅपचॅटवर खाती उघडतात. मात्र, नवीन कायद्यानुसार युरोपियन डिजिटल सेवा कायद्यांतर्गत 'वय पडताळणी' (Age Verification) अत्यंत अनिवार्य केली जाणार आहे. प्रत्येक वापरकर्त्याला तो 15 वर्षांपेक्षा जास्त वयाचा आहे, याचा ठोस पुरावा द्यावा लागेल. सोशल मीडियामुळे मुले कमी झोपत आहेत, अभ्यासात मागे पडत आहेत आणि सतत इतरांशी स्वतःची तुलना करत आहेत, असा चिंतेचा सूर खासदार लॉरे मिलर यांनी संसदेत व्यक्त केला.

हेही वाचा - India-EU FTA : 'हा करार जगात स्थिरता आणेल...'; भारत-युरोप मुक्त व्यापार करारावर मोदींची प्रतिक्रिया

जागतिक पातळीवर बंदीचे वारे
मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी फ्रान्स हा एकमेव देश नाही. ऑस्ट्रेलियाने गेल्या डिसेंबरमध्येच 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदीचा कायदा केला आहे. तसेच युनायटेड किंगडम (UK) सरकारदेखील अशाच प्रकारच्या निर्बंधांवर गांभीर्याने विचार करत आहे. यामुळे येत्या काळात युरोपातील अनेक देशांत मुलांसाठी सोशल मीडिया 'ब्लॉक' होण्याची शक्यता आहे. 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या