टोकियो (जपान): अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2028 मध्ये तिसऱ्या कार्यकाळासाठी निवडणूक लढवण्याची शक्यता खुली ठेवली असल्याचे संकेत दिले आहेत. एअर फोर्स वनमधील पत्रकारांशी बोलताना, व्हाईट हाऊसचे माजी मुख्य रणनीतीकार स्टीव्ह बॅनन यांनी सुचवलेल्या ‘असंवैधानिक तिसऱ्या कार्यकाळा’बद्दल विचारल्यावर ट्रम्प म्हणाले, “मला ते आवडेल. माझ्याकडे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट आकडे आहेत.” मात्र लगेचच त्यांनी स्पष्ट केले की, या विषयावर त्यांनी अद्याप गंभीरपणे विचार केलेला नाही.
ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळानंतर रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व कोणाकडे जाऊ शकते, याबाबतही संकेत दिले. त्यांनी परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ आणि उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हॅन्स यांचा 2028 च्या राष्ट्राध्यक्षीय स्पर्धेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून उल्लेख केला. “आमच्याकडे खूप चांगले लोक आहेत,” असे म्हणत त्यांनी रुबिओकडे इशारा केला. “आमच्याकडे महान नेते आहेत. मला सगळ्यांची नावे घ्यायची गरज नाही. त्यापैकी एक तर माझ्यासोबत इथेच उभे आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा: Rajnath Singh: 'सीमेवर तत्परता वाढवा, कोणत्याही वेळी युद्ध शक्य'; संरक्षणमंत्र्यांचा सैन्य दलांना सूचक इशारा
उपराष्ट्राध्यक्ष व्हॅन्स यांच्या कामगिरीचे कौतुक करताना ट्रम्प म्हणाले, “निश्चितच ते उत्कृष्ट आहेत. उपराष्ट्राध्यक्ष अत्यंत समर्थ आहेत. या दोघांविरोधात इतर कुणी उभं राहील असं मला वाटत नाही.” राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या एका संस्थेच्या अभ्यासानुसार, बॅनन हे ट्रम्प यांना तिसऱ्या कार्यकाळाचा विचार करण्यास उद्युक्त करणाऱ्या प्रमुख आवाजांपैकी एक आहेत. एका पॉडकास्टमध्ये बॅनन यांनी “तिसऱ्या कार्यकाळासाठी योजना तयार आहे” असा दावा केला होता. तथापि, अमेरिकेच्या संविधानानुसार राष्ट्राध्यक्षांना जास्तीत जास्त दोन कार्यकाळांची मर्यादा आहे, हे वास्तवही अधोरेखित होत आहे.
दरम्यान, आशिया दौर्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी डोनाल्ड ट्रम्प टोकियोत दाखल झाले आहेत. यापूर्वी त्यांनी मलेशियाचा दौरा पूर्ण केला असून ASEAN शिखर परिषदेतील सहभागाने त्यांचा हा दौरा चर्चेत राहिला. कुआलालंपूर सोडण्यापूर्वी त्यांनी मलेशियाच्या अधिकाऱ्यांना आणि नागरिकांना निरोप दिला.
ट्रुथ सोशलवर लिहिताना ट्रम्प म्हणाले, “मलेशिया हा अतिशय महान आणि ऊर्जावान देश आहे. मोठ्या व्यापार करारांवर आणि ‘रेअर अर्थ’ करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे थायलंड आणि कंबोडिया यांच्यात शांतता करारावर सही केली. आता युद्ध नाही! लाखो जीव वाचले. हे साध्य करण्याचा सन्मान मिळाला. आता मी जपानकडे रवाना होतोय!”
आशियातील या दौऱ्यातील भेटी आणि आर्थिक व कूटनीतिक करारांमुळे ट्रम्प यांची आंतरराष्ट्रीय उपस्थिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, तिसऱ्या कार्यकाळाबाबतचे त्यांच्या विधानाचे अमेरिकन राजकारणात नवे वादंग निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत.
हेही वाचा: Uddhav Thackeray : 'अनाकोंडा' म्हणत उद्धव ठाकरेंनी अमित शाहांवर डागली तोफ; निवडणूक आयोगालाही थेट इशारा! निर्धार मेळाव्यात घणाघात