UAE President Net Worth: खासगी विमाने, शेकडो लक्झरी कार्स आणि भव्य राजवाडे! किती आहे यूएईच्या राष्ट्राध्यक्षांची संपत्ती?

यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान हे जगातील सर्वात श्रीमंत शाही नेत्यांपैकी एक आहेत

UAE President Net Worth: खासगी विमाने, शेकडो लक्झरी कार्स आणि भव्य राजवाडे! किती आहे यूएईच्या राष्ट्राध्यक्षांची संपत्ती?

UAE President Net Worth: संयुक्त अरब अमीरातचे (UAE) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान हे आजच्या घडीला जगातील सर्वात प्रभावशाली आणि श्रीमंत शाही नेत्यांपैकी एक मानले जातात. ‘एमबीझेड’ या नावाने ओळखले जाणारे शेख मोहम्मद बिन जायद भारत दौऱ्यावर येत असताना, त्यांच्या अफाट संपत्तीची आणि शाही जीवनशैलीची पुन्हा एकदा जागतिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. भारत-यूएई संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

शेख मोहम्मद बिन जायद यांची वैयक्तिक संपत्ती सुमारे 30 अब्ज डॉलर्स इतकी असल्याचा अंदाज आहे. ही संपत्ती केवळ राजघराण्याची वारसा म्हणून मिळालेली नसून तेल महसूल, आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आणि विविध उद्योगांमधील हिस्सेदारीतून उभी राहिलेली आहे. बँकिंग, ऊर्जा, रिअल इस्टेट आणि जागतिक गुंतवणूक क्षेत्रात त्यांचा मोठा प्रभाव आहे. ते यूएईमधील सर्वात मोठ्या खासगी जमीनमालकांपैकी एक मानले जातात.

अल नाहयान राजवंशाबाबत बोलायचं झालं, तर हा जगातील सर्वात श्रीमंत शाही परिवार मानला जातो. या घराण्याची एकत्रित संपत्ती शेकडो अब्ज डॉलर्समध्ये आहे. अबू धाबीवर दीर्घकाळापासून या कुटुंबाचं राज्य असून, जागतिक तेल साठ्यांपैकी मोठा हिस्सा या घराण्याच्या नियंत्रणाखाली असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळेच या कुटुंबाची आर्थिक ताकद प्रचंड आहे.

यूएईच्या राष्ट्राध्यक्षांच्या संपत्तीत भव्य राजवाड्यांचाही समावेश आहे. अबू धाबीतील राष्ट्राध्यक्ष भवन ‘कास अल वतन’ हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. हजारो चौरस मीटरमध्ये पसरलेला हा राजवाडा केवळ प्रशासकीय केंद्र नाही, तर शाही वैभवाचं प्रतीक आहे. याशिवाय, युरोपसह अनेक देशांमध्ये या कुटुंबाचे आलिशान राजवाडे आणि मालमत्ता आहेत.

लक्झरी वाहनांच्या बाबतीतही अल नाहयान कुटुंबाचं नाव अग्रस्थानी घेतलं जातं. या शाही घराण्याकडे शेकडो महागड्या गाड्यांचा संग्रह असून, तो खास संग्रहालयांमध्ये जतन करून ठेवण्यात आला आहे. बुगाटी, फेरारी, मर्सिडीज, लॅम्बोर्गिनी यांसारख्या जगप्रसिद्ध ब्रँड्सच्या दुर्मिळ गाड्या या संग्रहात आहेत.

हवाई प्रवासासाठीही शाही परिवाराकडे स्वतंत्र विमानांचा भव्य ताफा आहे. बोईंग आणि एअरबससारख्या अत्याधुनिक विमानांचा यात समावेश आहे. याशिवाय, जगातील सर्वात मोठ्या आणि आलिशान सुपरयॉट्सपैकी एक असलेली ‘अज्जाम’ यॉटही याच कुटुंबाच्या मालकीची आहे. समुद्रावर फिरणारा हा तरंगता राजवाडा मानला जातो.

तेल आणि रिअल इस्टेटपुरतेच न थांबता, अल नाहयान कुटुंबाने अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. ऑटोमोबाईल, फॅशन, तंत्रज्ञान आणि अंतराळ क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांची हिस्सेदारी आहे. एकूणच, शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांची संपत्ती ही केवळ वैभवाचं प्रतीक नसून, जागतिक राजकारण आणि अर्थकारणात यूएईची ताकद दर्शवणारी आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number