Russia-Europe Relations : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युरोपातील देशांना निर्वाणीचा (Ultimatum) आणि कठोर इशारा दिला आहे. युरोपने रशियाच्या विरोधात युद्ध (Europe Russia Conflict) सुरू केल्यास, चोख प्रत्युत्तर दिले जाईल, हे विसरू नका, असे ते म्हणाले. पुतिन यांनी स्पष्ट केले की रशियाला युरोपशी युद्ध करण्यात कोणताही रस नाही. मात्र, "जर तुम्ही सुरुवात केली, तर सगळ्या गोष्टी इतक्या लवकर संपुष्टात येतील की तुमच्याकडून चर्चा करायलाही कोणी उरणार नाही," असा थेट इशारा पुतिन यांनी दिला आहे.
युक्रेन युद्धाचे स्वरूप 'सर्जिकल स्ट्राईक'चे
पुतिन यांनी असेही स्पष्ट केले की, युक्रेनसोबत (Ukraine) रशियाचे जे युद्ध सुरू आहे, ते पूर्ण स्वरूपाचे नाही. ते म्हणाले, "आम्ही सर्जिकल स्ट्राईकसारख्या काही मर्यादित कारवाया करत आहोत." पण जर युरोपला युद्ध हवे असेल, तर मात्र थेट युद्ध होईल. जर युरोपने सुरुवात केली, तर रशिया पूर्ण ताकदीने उत्तर देईल, असे त्यांनी निक्षून सांगितले आहे.
दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात मोठा संघर्ष
रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष सुरू होऊन आता चार वर्षे झाली आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपातील देशांसोबतचा हा सर्वात मोठा संघर्ष आहे. या संघर्षात युक्रेनला युरोपातील देशांकडून आणि अमेरिकेकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. युरोपियन देशांचे म्हणणे आहे की, जर पुतिन यांनी युक्रेनशी युद्ध जिंकले, तर ते कोणत्याही नाटो (NATO) देशावर हल्ला करू शकतात. मात्र, पुतिन यांनी हा दावा खोडसाळ असल्याचे म्हटले आहे.
नाटोवर हल्ला करण्याचा जर्मनीचा दावा
जर्मनीचे परराष्ट्र मंत्री योहान वेडफुल यांनी 25 नोव्हेंबरला असा दावा केला होता की, रशिया पुढील चार वर्षांत नाटो (NATO) देशावर हल्ला करू शकतो. आमच्या गुप्तचर यंत्रणांनी माहिती दिली आहे की, 2029 पर्यंत रशिया नाटो देशाच्या विरोधात युद्ध पुकारेल. रशियाला फक्त युक्रेनवरच कब्जा करायचा नाही, असे त्यांनी म्हटले होते. सध्या रशियाने आपली ताकद वाढवण्यास आणि शस्त्रांची निर्मिती (Russia Weapon Manufacturing) करण्यावर भर दिला आहे.
चर्चेचे मार्ग बंद केल्याने दिला इशारा
पुतिन यांनी सांगितले की, युरोपियन देशांनीच चर्चेचे मार्ग (Avenues for dialogue) बंद केले आहेत. त्यामुळेच रशियाला हे स्पष्ट करावे लागत आहे की, जर युरोपला खरोखरच युद्ध हवे असेल, तर रशिया पूर्ण ताकदीने उत्तर द्यायला तयार आहे. अशाप्रकारे पुतिन यांनी युरोपातील देशांना युद्ध न करण्याबद्दल एकप्रकारे इशारा दिला आहे.
व्लादिमीर पुतिन यांची 4 आणि 5 डिसेंबरची भारत भेट
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे 4 आणि 5 डिसेंबरला भारत भेटीवर येत आहेत. या भेटीदरम्यान, त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अनेक महत्त्वाच्या द्विपक्षीय (India-Russia Bilateral Relations) आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्याचे नियोजन आहे. भारत-रशिया संबंध अधिक मजबूत करणे, संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवणे तसेच व्यापार आणि ऊर्जा भागीदारीवर लक्ष केंद्रित केले जाईल. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील विशेष आणि विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारीला (India-Russia Strategic Partnership) नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांची ही भेट आंतरराष्ट्रीय स्तरावरही महत्त्वपूर्ण मानली जात आहे.