Wednesday, November 19, 2025 01:14:43 PM

Pakistan Afghanistan Conflict: 'तालिबानशी शांतता चर्चेसाठी तयार...'; शाहबाज शरीफ यांची मोठी घोषणा

शरीफ यांनी असा आरोप केला की अलीकडील हल्ले भारताच्या संकेतावर झाले, कारण त्या वेळी अफगाण परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी भारताच्या दौर्‍यावर होते.

pakistan afghanistan conflict तालिबानशी शांतता चर्चेसाठी तयार शाहबाज शरीफ यांची मोठी घोषणा

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील 48 तासांची युद्धबंदी शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता संपत आहे. त्याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी तालिबानसोबत शांतता चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी म्हटले की, 'पाकिस्तान शांततेसाठी तयार आहे, पण या चर्चा वाजवी आणि परस्पर आदरावर आधारित असाव्यात.' गुरुवारी झालेल्या फेडरल कॅबिनेट बैठकीत शरीफ यांनी हे विधान केले. त्यांनी पुढे सांगितले, 'आम्ही अफगाणिस्तानला आपला भाऊ मानून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले, पण अफगाणिस्तानने युद्धाचा मार्ग स्वीकारला.' 

दरम्यान, शरीफ यांनी असा आरोप केला की अलीकडील हल्ले भारताच्या संकेतावर झाले, कारण त्या वेळी अफगाण परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी भारताच्या दौर्‍यावर होते. तथापि, त्यांनी यासाठी कोणताही पुरावा दिला नाही. शरीफ म्हणाले, 'आता चेंडू अफगाणिस्तानच्या कोर्टात आहे. त्यांना ठरवायचे आहे की कायमस्वरूपी युद्धबंदी हवी आहे की नाही. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत.' 

हेही वाचा - H-1B Visa: एच-1बी शुल्कवाढीप्रकरणी ट्रम्प सरकारविरोधात खटला, यूएस चेंबर ऑफ कॉमर्स संस्थेने केली कारवाई

पाकिस्तानचा काबूलमध्ये हवाई हल्ला 

पाकिस्तानने काबूलमध्ये दोन हवाई हल्ले केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला. प्रत्युत्तर म्हणून तालिबानने प्रतिहल्ला केला. त्यानंतर दोन्ही देशांनी बुधवारी 48 तासांची युद्धबंदी जाहीर केली. शरीफ यांनी सांगितले की अफगाणिस्तानच्या भूमीतून दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत, ज्यात निष्पाप नागरिक आणि पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू होत आहे. आमचा संयम संपला होता, त्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावे लागले, असंही शरीफ यांनी म्हटलं. 

हेही वाचा - India Refutes Trump Claim: 'मोदी-ट्रम्प यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही...'; अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या दाव्याचे भारताकडून खंडन

भारताचा पाकिस्तानवर पलटवार

तथापी, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले की, पाकिस्तानला दहशतवादी संघटनांना आश्रय देण्याची आणि स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देण्याची जुनी सवय आहे. तो अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर नाराज आहे. 

संयुक्त राष्ट्र, चीन आणि इतर देशांनी दोन्ही बाजूंना कायमस्वरूपी युद्धबंदी राखण्याचे आवाहन केले आहे. UNAMA (United Nations Assistance Mission in Afghanistan) ने युद्धबंदीचे स्वागत केले आणि सांगितले की स्पिन बोल्दाक येथे सर्वाधिक नुकसान झाले. UNAMA ने दोन्ही देशांना नागरिकांच्या संरक्षणावर भर देण्याचे आवाहन केले. शरीफ यांनी सांगितले की कतारचे अमीर आणि इजिप्त सरकार यांनीही या तणावावर चिंता व्यक्त केली असून, मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे.
 


सम्बन्धित सामग्री