Shehbaz Sharif Arrest Warrant: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. हे वॉरंट बलुचिस्तानच्या निर्वासित सरकारने (Exile Government of Balochistan) जारी केले असून, शाहबाज शरीफ यांच्यावर बलुचिस्तानच्या व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे. या घडामोडींमुळे पाकिस्तानातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
व्हिसा नियमांचे उल्लंघन आणि सार्वभौमत्वाला धक्का
बलुचिस्तान प्रजासत्ताकाचे प्रतिनिधी मीर यार बलोच यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बलुचिस्तानच्या व्हिसा नियमांचे जाणूनबुजून उल्लंघन केले आहे. त्यांनी वैध व्हिसाशिवाय बेकायदेशीर प्रवेश करून बलुचिस्तानच्या सार्वभौमत्वाला गंभीर इजा पोहोचवली आहे.” या आरोपांखाली त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
The Republic of Balochistan issues arrest warrant of Pakistan's PM Shehbaz Sharif over violation of Balochistan's visa rules. 8th January 2026 The Prime Minister of Pakistan is liable to arrest by the Republic of Balochistan for grave and deliberate violations of Balochistan’s… pic.twitter.com/v1R9PpkgOo — Mir Yar Baloch (@miryar_baloch) January 8, 2026
हेही वाचा – US India trade: ट्रम्प टॅरिफ धोरणाचा थेट परिणाम भारतावर; कोळंबी व वस्त्रोद्योग शेअर्समध्ये मोठी घसरण
विमानतळावर होऊ शकते अटक
दरम्यान, 8 जानेवारी 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या या अधिकृत आदेशानुसार, शाहबाज शरीफ यांना बलुचिस्तानमधील कोणत्याही विमानतळावर आगमन करताना किंवा तिथून प्रस्थान करताना अटक केली जाऊ शकते. बलुचिस्तानच्या कायद्यानुसार आणि सार्वभौम अधिकारानुसार ही कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बलुचिस्तानमधील फुटीरतावादी चळवळ आणि निर्वासित सरकारचा हा पवित्रा पाकिस्तान सरकारसाठी मोठे आंतरराष्ट्रीय लाजिरवाणे ठरू शकते. पाकिस्तानमधील अशांतता आणि बलुचिस्तानमधील वाढता विरोध पाहता, या अटक वॉरंटचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, पाकिस्तान सरकारकडून या वॉरंटवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.